Virat Kohli Cheteshwar Pujara Rahul Dravid, WTC 2023 IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला आता केवळ तीनच दिवस शिल्लक आहेत. 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेतेपदाचा सामना सुरू होईल आणि त्यानंतर रेकॉर्ड बनवण्याची आणि तोडण्याची रांगच लागेल अशा चाहत्यांच्या अपेक्षा आहेत. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराही याच विचारात असून, या सामन्यात ते दोघेही विक्रम मोडण्याच्या दृष्टीने आगेकूच करताना दिसतील. वास्तविक, या दोन्ही खेळाडूंच्या नजरा संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा विक्रम मोडण्याकडे आहेत.
राहुल द्रविडचा असा कोणता विक्रम आहे, जो आपण तोडण्याबद्दल बोलत आहोत, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हा विक्रम भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीच्या आकडेवारीशी संबंधित आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांपैकी सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये राहुल द्रविड तिसऱ्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविडच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2143 धावा आहेत. पण, आता चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या दोघांनाही WTC च्या अंतिम फेरीत राहुल द्रविडला मागे सोडण्याची संधी आहे.
धावांच्या यादीत पुजारा द्रविडच्या पाठोपाठ
द्रविडने कांगारूंविरुद्ध 32 कसोटी सामन्यांच्या 60 डावात 2143 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 शतके आणि 13 अर्धशतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 24 कसोटी सामन्यांच्या 43 डावात 2033 धावा केल्या आहेत. म्हणजे, जर राहुल द्रविडला मागे सोडायचे असेल तर पुजाराला WTC फायनलच्या दोन्ही डावात 110 धावा कराव्या लागतील.
विराट यादीत पाचव्या स्थानी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 24 कसोटी सामन्यांच्या 42 डावांनंतर विराट कोहलीच्या 1979 धावा आहेत आणि तो 5व्या क्रमांकावर आहे. पण, राहुल द्रविडला मागे सोडणे फार दूर नाही. विराट कोहलीला द्रविडचा विक्रम मोडण्यासाठी डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या दोन्ही डावात १६४ धावा कराव्या लागतील.