WTC 2023 IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेत ६ सामन्यात 297 धावा आणि IPLच्या 14 सामन्यात 639 धावा... गेल्या चार महिन्यांत विराट कोहलीच्या बॅटमधून सतत धावा निघत आहेत. फॉरमॅट वेगळे होते पण धावांचा ओघ कायम होता. 7 जूनपासून सुरू होणार्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलकडे पाहता विराट कोहली हीच शैली कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. पण हे इतके सोपे असणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे 16 या संख्येशी असलेलं विराटचं कनेक्शन.
काय आहे कोहलीसाठी 16 संख्येचं टेन्शन?
गेल्या एक वर्षापासून कोहली ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता सर्वजण त्याला मोठा धोका मानत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनेही कोहलीच्या धोक्याबाबत ऑस्ट्रेलियाला इशारा दिला आहे. पण एक असाही धोका आहे जो खुद्द कोहलीची वाट पाहत आहे. तसे पाहता टीम इंडियाचा माजी कर्णधार कोहलीची कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्कृष्ट आहे. कोहलीने या संघाविरुद्ध 8 शतके ठोकली असून जवळपास दोन हजार धावा केल्या आहेत. पण ऑस्ट्रेलियाचा सुपरस्टार वेगवान गोलंदाज आणि कर्णधार पॅट कमिन्सच्या विरोधात तो कमी पडल्याचे दिसले आहे. 16 या संख्येशी कोहलीचं कनेक्शन इथेच दिसून येतं.
विराटची पॅट कमिन्स विरूद्धची कसोटीतील सरासरी फक्त १६ आहे. कोहलीने आजपर्यंत कमिन्स विरुद्ध कसोटीत केवळ 82 धावा केल्या आहेत, तर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने कोहलीला 5 वेळा आपली शिकार बनवली आहे. म्हणजेच कमिन्सविरुद्ध कोहलीने केवळ 16 च्या सरासरीने धावा केल्या असून WTC Final मध्येही कमिन्स विरूद्ध कोहलीला सावध राहावे लागणार आहे.