कसोटी विश्वविजेतेपदाच्या सामन्यात पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. पहिल्या अर्ध्या तासात भारतीय गोलंदाजांचा वरचष्मा राहिला. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मनसोक्त फटकेबाजी केली. ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ जोडीने भारतीय गोलंदाजांना नाबाद २५१ धावांचा आहेर दिला. त्याच जोरावर पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ३ बाद ३२७ धावांपर्यंत मजल मारली.
दरम्यान, यानंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी रोहित शर्मा आणि टीम इंडियावर संताप व्यक्त केला. या मोठ्या सामन्यात पहिल्या क्रमांकाचा कसोटी फिरकीपटू आर अश्विनला प्लेईंग इेल्व्हनमधून बाहेर ठेवण्याचा निर्णय आपल्या समजण्यापलिकडचा असल्याचं म्हटलं. तसंच कोणत्या खेळाडूची जागा अश्विनला दिली असती याबाबतही त्यांनी भाष्य केलं.
"भारतीय संघानं अश्विनला न खेळवून मोठी चूक केली आहे. तुम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची फायनल खेळत आहात आणि त्यात तुम्ही कसोटी क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूचा समावेश करत नाही. टीम इंडियाचा हा निर्णय माझ्या समजण्यापलिकडला आहे. मी उमेश यादव ऐवजी त्याला संघात स्थान दिलं असतं," असं गावस्कर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले. "ऑस्ट्रेलियन संघात चार डावखुरे फलंदाज आहेत आणि अश्विननं त्यांच्याविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. या संघात एकही ऑफस्पिनर नाही ही आश्चर्यकारक बाब आहे," असंही त्यांनी नमूद केलं.