भारतीय संघाला मिळालेल्या ४४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरूवात चांगली झाली. पण चहापानाच्या विश्रांतीआधी एक मोठा फटका भारताला बसला. शुबमन गिल चांगल्या लयीत दिसत होता. पण त्याच वेळी कॅमेरॉन ग्रीननं त्याचा स्लिपमध्ये कॅच घेतला आणि त्याला बाद केले. रिप्लेमध्ये चेंडू जमिनीला घासल्याचे दिसत असल्याचा दावा अनेकांनी केला, पण अखेर तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यामुळे शुबमनला १८ धावांवर माघारी परतावे लागले. दरम्यान, यावर आता ग्रीननं प्रतिक्रिया दिली आहे.
शुभमन गिलला बाद करणाऱ्या वादग्रस्त झेलचं ग्रीननं समर्थन केलं. फायनलचा विचार करता हा अत्यंत महत्त्वाचा झेल असल्याचंही त्यानं सांगितलं. दरम्यान, केटलबरोनं योग्य निर्णय घेतल्याचं मत रिकी पॉंटिंगनं व्यक्त केलं. "निश्चितरित्या मला वाटलं की मी तो कॅच पकडला आहे. तसंच नंतर मी चेंडू हवेत उडवला आणि यात शंका घेण्यासारखं काहीही दिसत नाही. यानंतर निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला आणि त्यांनीही यावर सहमती दर्शवली," असं ग्रीन म्हणाला.
शुबमन गिलचा वादग्रस्त झेलरोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने दमदार सुरूवात केली. चांगले चेंडू बचावात्मक खेळत आणि सहज आलेल्या चेंडूंवर फटकेबाजी करत दोघंही चांगली आगेकूच करत होते. त्यामुळे ७ षटकांत भारताची धावसंख्या ४१ झाली होती. पण त्यानंतर एक घटना घडली आणि वाद निर्माण झाला. शुबमन गिलनं स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर चेंडू मारला. चेंडू स्लिपमध्ये गेला आणि कॅमेरॉन ग्रीननं त्याला बाद ठरवलं. रिप्ले पाहताना चेंडू खाली घासला असल्याचा अनेकांना वाटलं. पण तिसऱ्या पंचांनी मात्र गिलला बाद ठरवलं. त्यामुळे रोहित शर्मा आणि शुबमन गिलदेखील भडकले. पण नाइलजाने गिलला माघारी जावे लागले.