Pakistan vs Bangladesh, WTC Latest Points Table: पाकिस्तान क्रिकेट संघाला बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळाला. बांगलादेशने पहिली कसोटी १० गडी राखून तर दुसरी कसोटी ६ गडी राखून जिंकली. बांगलादेशने प्रथमच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. घरच्या मैदानावर पाकिस्तानी खेळाडूंना सोसावा लागणारा हा पराभव त्यांच्या WTC 2025 च्या मोहिमेला मोठा धक्का मानला जात आहे.
पाकिस्तानसाठी समीकरण कठीण
या पराभवामुळे पाकिस्तान संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या गुणांची टक्केवारी आता १९.०५ वर घसरली आहे. पाकिस्तानचे ७ सामन्यांत २ विजय आणि ५ पराभवांसह केवळ १६ गुण आहेत. WTC च्या सध्याच्या स्पर्धेत पाकिस्तानचे आणखी सात सामने शिल्लक आहेत. त्यांना इंग्लंडविरुद्ध ३ आणि मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध २ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २ सामने खेळायचे आहेत. जर पाकिस्तानी संघाला टॉप-2 मध्ये स्थान मिळवायचे असेल तर त्यांना हे सातही सामने जिंकावे लागतील.
बांगलादेशची मोठी झेप
दुसरीकडे, कसोटी मालिकेतील शानदार विजयासह बांगलादेशचा संघ आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. बांगलादेशचे ६ सामन्यांत ३३ गुण आहेत आणि त्याची गुणांची टक्केवारी ४५.८३ आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. १९ सप्टेंबरपासून बांगलादेशला भारताविरूद्धच दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
भारताला फायनल दृष्टीपथात!
भारतीय संघाचे आतापर्यंत ९ सामन्यांत ६ विजय, २ पराभव आणि १ अनिर्णित असे ७४ गुण आहेत. गुणांची टक्केवारी ६८.५२ आहे. भारताला नोव्हेंबरमध्ये पाच कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. त्यापूर्वी बांगलादेश मालिका आणि न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामने खेळायचे आहेत. या १० पैकी ५ कसोटी सामने भारताने जिंकले तर भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित होईल.
WTC गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे १२ सामन्यांत ८ विजय, ३ पराभव आणि एक टाय असे ९० गुण आहेत. त्याच्या गुणांची टक्केवारी ६२.५० आहे.