WTC 2025 Updated Points Table- न्यूझीलंड विरुद्धची मालिका आधीच गमावलेल्या टीम इंडियानं मुंबई कसोटी सामन्यातील पराभवासह लाज गमावली अन् त्यासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील नंबर वनचा ताजही गमावला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील ३-० अशा पराभवानंतर भारतीय संघाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. न्यूझीलंडच्या विजयाचा ऑस्ट्रेलियाला फायदा झाला असून ते आता गुणतालिकेत नंबर वन ठरले आहेत.
न्यूझीलंडचा संघाला झाला मोठा फायदा
भारतीय मैदानातील ऐतिहासिक कामगिरीसह न्यूझीलंडच्या संघालाही मोठा फायदा झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलच्या शर्यतीत हा संघ ५४.५४ विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानावर पोहचला आहे. दुसरीकडे भारतीय संघाच्या खात्यात ५८.३३ विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियानं संघानं केला अव्वलस्थानी कब्जा
भारत-न्यूझीलंड यांच्यातील निकालाचा ऑस्ट्रेलियाला घर बसल्या फायदा झाला आहे. कांगारूंचा संघ ६२.५० या विजयी टक्केवारीसह आता अव्वलस्थानावर विराजमान झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत ६० पेक्षा अधिक विनिंग पर्सेंटेज असणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे. श्रीलंकेचा संघ ५५.५६ विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर असल्याचे दिसून येते.
तिसऱ्यांदा WTC फायनल खेळण्यासाठी टीम इंडियाला पार करावं लागेल मोठं चॅलेंज
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आतापर्यंतच्या दोन्ही हंगामात भारतीय संघ फायनलपर्यंत पोहचल्याचे पाहायला मिळाले होते. पण आता मात्र भारतीय संघाचा इथंपर्यंत पोहचण्याचा मार्ग खूपच खडतर झाला आहे. जर स्वबळावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठायची असेल तर त्यांना ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्या घरात जाऊन ४-० अशी मात द्यावी लागेल. याआधी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका जिंकून इतिहास रचला आहे. पण यावेळीचं आव्हान खूपच मोठे आहे. घरच्या मैदानातील ढिसाळ कामगिरी बघता ऑस्ट्रेलियात त्यांच्यासाठी हे खूप मोठे चॅलेंज असेल.
संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णित | गुण | विजयाची टक्केवारी | ||
१ | ऑस्ट्रेलिया | १२ | ८ | ३ | १ | ९० | ६२.५ | |
२ | भारत | १४ | ८ | ५ | १ | ९८ | ५८.३३ | |
३ | श्रीलंका | ९ | ५ | ४ | ० | ६० | ५५.५५ | |
४ | न्यूझीलंड | ११ | ५ | ६ | ० | ७२ | ५४.५४ | |
५ | दक्षिण आफ्रिका | ८ | ४ | ३ | १ | ५२ | ५४.१६ | |
६ | इंग्लंड | १९ | ९ | ९ | १ | ९३ | ४०.७९ | |
७ | पाकिस्तान | १० | ४ | ६ | ० | ४० | ३३.३३ | |
८ | बांगलादेश | १० | ३ | ७ | ० | ३३ | २७.५० | |
९ | वेस्टइंडिज | ९ | १ | ६ | २ | २० | १८.५२ |