World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं एका सामन्याच्या निकालावर सर्वोत्तम संघ ठरवला जाऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरवण्यासाठी फायनलमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी, असे मत विराटनं न्यूझीलंडकडून ८ विकेट्सनं पराभव पत्करल्यानंतर व्यक्त केलं. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये बुधवारी केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील संघानं टीम इंडियाचा पराभव केला.
''जगातील सर्वोत्तम संघ एका सामन्याच्या निकालावर ठरवण्याच्या पक्षात मी नाही. हे दोन दिवसांच्या खेळात प्रचंड दडपण निर्माण करण्यासारखं आहे. भविष्यात याबाबत विचार करायला हवा. तीन सामन्यांची मालिका खेळवायला हवी. त्यात चढ-उतार होतील आणि चूका सुधारण्याची संधी मिळेल. त्यामुळे जो निकाल लागेल त्याबाबत पर्वा करण्याची गरज भासणार नाही,''असे तो म्हणाला.
तो पुढे म्हणाला,''ज्या पद्धतीनं हा सामना झाला, तर मग तीन कसोटी का खेळवण्यात येत नाहीत? कसोटीत तुम्ही ज्या ऐतिहासिक मालिका पाहिल्यात, त्या तीन किंवा पाच सामन्यांच्या होत्या. याचा विचार व्हायला हवा. आम्ही हरलोय म्हणून मी हे बोलत नाही.''
''WTC स्पर्धा सध्याच्या दोन वर्षांच्या सर्कल व्यतिरिक्त चार वर्षांच्या सर्कलमध्ये खेळवण्यात यायला हवी. जेणेकडून प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध अधिकाधिक सामने खेळेल,''असेही विराट म्हणाला. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही याआधी तीन सामन्यांच्या मालिकेत फायनल खेळवायला हवी असे विधान केलं होतं.