India in numbers at the World Test Championships : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल येत्या 18 जूनपासून सुरू होत आहे. भारतीय संघ साऊदॅम्प्टन येथे न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
WTC Final पर्यंतचा भारतीय संघाचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. वेस्ट इंडिज ते इंग्लंड अशा कसोटी मालिकांमध्ये विजय मिळवून भारतानं अंतिम फेरीत प्रवेश पक्का केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात मिळवलेला ऐतिहासिक कसोटी विजय हा भारताच्या प्रवासाला चार चाँद लावणारा ठरला.'
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वात मोठ्या फरकानं विजय मिळवण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर आहे. अजिंक्य रहाणेच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघानं वेस्ट इंडिजवर 318 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. WTC मधील भारताचा तो पहिलाच सामना होता. सर्वाधिक विकेट्स हातचे राखून मिळवण्याच्या विक्रमात भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका बरोबरीवर आहेत. भारतानं अहमदाबाद कसोटीत इंग्लंडवर 10 विकेट्स राखून विजय मिळवला, या सामन्यात रोहित शर्मानं निर्णायक 66 धावा आणि अक्षर पटेलनं 11 विकेट्स घेतल्या होत्या. डावानं विजयाच्या बाबतीत टीम इंडियानं रोहित शर्माच्या द्विशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर 1 डाव व 202 धावांनी विजय मिळवला आहे. याही विक्रमात टीम इंडिया आघाडीवर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक शतकांचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्यानं 11 सामन्यांत चार शतकं झळकावली आहेत. पण, सर्वाधिक पाच शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन आघाडीवर आहे आणि पाकिस्तानचा बाबर आझम 10 सामन्यांत 4 शतकांसह रोहितच्या पुढे आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाजी सरासरीतही भारत आघाडीवर आहे. भारतीय गोलंदाजांनी 22.57 च्या सरासरीनं गोलंदाजी केली आहे.
भारताकडून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक 1095 धावांचा विक्रम अजिंक्य रहाणेनं केला आहे. रोहित शर्माच्या खात्यात 1030 धावा आहेत. विराट कोहली, मयांक अग्रवाल व चेतेश्वर पुजारा यांनी अनुक्रमे 877, 857 व 818 धावा केल्या आहेत. आर अश्विन यानं 13 सामन्यांत सर्वाधिक 67 विकेट्स घेतल्या आहेत. फायनलमध्ये त्यानं चार विकेट्स घेताच WTC मध्ये सर्वाधिक विकेट्सचा विक्रमही त्याच्या नावावर होईल.इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 36, जसप्रीत बुमराहनं 34 विकेट्स घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विशाखापट्ट्णम कसोटीत रोहित शर्मा ( 176) व मयांक अग्रवाल ( 215) यांनी 317 धावांची विक्रमी भागीदारी केली होती.