WTC Final 2023: रहाणे-शार्दुल यांनी टाळला फॉलोऑन; ऑस्ट्रेलिया एकूण २९६ धावांनी आघाडीवर

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ४४ षटकांत ४ बाद १२३ धावा करत एकूण २९६ धावांची आघाडी मिळवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 08:07 AM2023-06-10T08:07:22+5:302023-06-10T08:08:42+5:30

whatsapp join usJoin us
wtc final 2023 ajinkya rahane and shardul thakur avoid follow on australia leads the total by 296 runs | WTC Final 2023: रहाणे-शार्दुल यांनी टाळला फॉलोऑन; ऑस्ट्रेलिया एकूण २९६ धावांनी आघाडीवर

WTC Final 2023: रहाणे-शार्दुल यांनी टाळला फॉलोऑन; ऑस्ट्रेलिया एकूण २९६ धावांनी आघाडीवर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर, लंडन : प्रमुख फलंदाजांकडून निराशा झाल्यानंतर आयपीएल गाजवलेला अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर या दोन मुंबईकरांनी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात काही प्रमाणात सावरले; मात्र दोघेही बाद झाल्यानंतर कांगारुंनी भारताचा पहिला डाव ६९.४ षटकांत २९६ धावांमध्ये संपुष्टात आणत १७३ धावांची भक्कम आघाडी घेतली. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ४४ षटकांत ४ बाद १२३ धावा करत एकूण २९६ धावांची आघाडी मिळवली.

ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ४६९ धावांमध्ये रोखल्यानंतर भारताची दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद १५१ धावा अशी अवस्था झाली होती. तिसऱ्या दिवशी या धावसंख्येवरून सुरुवात करताना श्रीकर भरत दुसऱ्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. परंतु, रहाणे आणि शार्दुल यांनी सहजासहजी हार पत्करली नाही. 

मुंबई क्रिकेटची ओळख असलेल्या ‘खडूस’ शैलीप्रमाणे चिवट फलंदाजी करताना दोघांनी सातव्या गड्यासाठी १४५ चेंडूंत १०९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यामुळे भारतीयांना फॉलोऑनचे संकट टाळता आले. रहाणेने १२९ चेंडूंत ११ चौकार व एका षट्कारासह ८९ धावांची झुंजार खेळी केली. दुसरीकडे, शार्दुलनेही त्याला तोलामोलाची साथ देताना द ओव्हल मैदानावर सलग तिसरे अर्धशतक झळकावत १०९ चेंडूंत ६ चौकारांसह ५१ धावा केल्या.

रहाणे-शार्दुलला मिळालेले जीवदान

- ४४व्या षटकात कमिन्सच्या गोलंदाजीवर कॅमरुन ग्रीनने गलीमध्ये शार्दुलचा झेल सोडला. शार्दुल त्यावेळी केवळ ८ धावांवर खेळत होता.

- ५६ व्या षटकात कमिन्सच्याच गोलंदाजीवर स्लिपमध्ये वॉर्नरने रहाणेचा झेल सोडला. रहाणे त्यावेळी ७२ धावांवर खेळत होता.

जडेजाने घेतले २ बळी

भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला ४४ षटकांत ४ बाद १२३ धावा असे अडचणीत आणले. डेव्हिड वॉर्नर (१) आणि उस्मान ख्वाजा (१३) यांना स्वस्तात बाद करत भारताने कांगारुंची २ बाद २४ धावा अशी अवस्था केली. यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ (३४) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ९६ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी करत संघाला सावरले. रवींद्र जडेजाने ही जोडी फोडताना स्मिथला ३१व्या षटकात बाद केले. यानंतर जडेजाने ट्रॅविस हेड (१८) यालाही बाद करत भारताला पुनरागमन करून दिले.

- अजिंक्य रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये ५ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो १३वा भारतीय ठरला.
- डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणारा अजिंक्य रहाणे पहिला भारतीय फलंदाज ठरला.
- शार्दुल ठाकूरने द ओव्हल मैदानावर सलग तिसरे अर्धशतक झळकावले.
- मिचेल स्टार्कने ६०० आंतरराष्ट्रीय बळी पूर्ण केले. असा पराक्रम करणारा तो ऑस्ट्रेलियाचा केवळ तिसरा वेगवान गोलंदाज ठरला.
- द ओव्हलवर सलग तीनवेळा ५०हून अधिक धावांची खेळी करणारा शार्दुल इंग्लंडबाहेरील केवळ तिसरा, तर पहिला आशियाई फलंदाज ठरला. याआधी, सर डॉन ब्रॅडमन (१९३०-३४) आणि ॲलेन बॉर्डर (१९८५-८९) यांनी असा पराक्रम केला होता.

रहाणे-शार्दुल यांची महत्त्वपूर्ण भागीदारी

अजिंक्य रहाणे भारताचा हिरो ठरला. शार्दुल ठाकूरही चमकदार ठरला. पण, रहाणेने ज्याप्रकारे भारतीय डावाला आकार दिला, त्यावरून तो तिसऱ्या दिवसाचा मानकरी ठरला. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक मालिका विजयामध्येही रहाणेची कामगिरी मोलाची ठरली होती. याच रहाणेला संघातील स्थान दीर्घकाळ राखता आलेले नाही. खराब कामगिरीमुळे त्याला संघाबाहेर केले जाते आणि जेव्हा संघाला गरज असते तेव्हा त्याला बोलाविले जाते. अशाही परिस्थितीत रहाणे संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतो. रहाणे-शार्दुल यांच्या भागीदारीमुळे हा सामना एकतर्फी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही ऑस्ट्रेलिया १७३ धावांच्या भक्कम आघाडीमुळे सामन्यात बराच पुढे आहे. हीच आघाडी द्विशतकीही ठरली असती, जर रहाणे-शार्दुल खेळले नसते. आता ऑस्ट्रेलियाला मर्यादित धावसंख्येत रोखणे भारतासाठी महत्त्वाचे ठरेल.

अरे यार, झोपू तरी द्या!

ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात चौथ्याच षटकात धक्का बसला. डेव्हिड वॉर्नर सिराजच्या गोलंदाजीवर केवळ एक धाव काढून बाद झाला. यादरम्यान तिसऱ्या क्रमांकावर येणारा मार्नस लाबुशेन फलंदाजीसाठी सज्ज झाला होता. सुरुवातीचे तीन षटके दोन्ही सलामीवीर चांगल्याप्रकारे खेळल्याने लाबुशेनने झोप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यातच वॉर्नर बाद झाल्याने लाबुशेनची झोपमोड झाली.

धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १२१.३ षटकांत सर्वबाद ४६९ धावा. भारत (पहिला डाव) : भारत : रोहित शर्मा पायचीत गो. कमिन्स १५, शुभमन गिल त्रि. गो. बोलँड १३, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. ग्रीन १४, विराट कोहली झे. स्मिथ गो. स्टार्क १४, अजिंक्य रहाणे झे. ग्रीन गो. कमिन्स ८९, रवींद्र जडेजा झे. स्मिथ गो. लायन ४८, श्रीकर भरत त्रि. गो. बोलँड ५, शार्दुल ठाकूर झे. कॅरी गो. ग्रीन ५१, उमेश यादव त्रि. गो. कमिन्स ५, मोहम्मद शमी झे. कॅरी गो. स्टार्क १३, मोहम्मद सिराज नाबाद ०. अवांतर - २९. एकूण : ६९.४ षटकांत सर्वबाद २९६ धावा. बाद क्रम : १-३०, २-३०, ३-५०, ४-७१, ५-१४२, ६-१५२, ७-२६१, ८-२७१, ९-२९४, १०-२९६. 

गोलंदाजी : मिचेल स्टार्क १३.४-०-७१-२; पॅट कमिन्स २०-२-८३-३; स्कॉट बोलँड २०-६-५९-२; कॅमरुन ग्रीन १२-१-४४-२; नाथन लायन ४-०-१९-१. 

ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : उस्मान ख्वाजा झे. भरत गो. उमेश १३, डेव्हिड वॉर्नर झे. भरत गो. सिराज १, मार्नस लाबुशेन खेळत आहे ४१, स्टीव्ह स्मिथ झे. ठाकूर गो. जडेजा ३४, ट्रॅविस हेड झे. व गो. जडेजा १८, कॅमरुन ग्रीन खेळत आहे ७. अवांतर - ९. एकूण : ४४ षटकांत ४ बाद १२३ धावा. बाद क्रम : १-२, २-२४, ३-८६, ४-१११. गोलंदाजी : मोहम्मद शमी १०-४-१७-०; मोहम्मद सिराज १२-२-४१-१; शार्दुल ठाकूर ६-१-१३-०; उमेश यादव ७-१-२१-१; रवींद्र जडेजा ९-३-२५-२.


 

Web Title: wtc final 2023 ajinkya rahane and shardul thakur avoid follow on australia leads the total by 296 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.