WTC Final 2023 : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. संघातील खेळाडूंवर अनेक दिग्गज प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने भारताचे दिग्गज फलंदाज रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांना सुनावले आहे. त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल मोठे प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यावरून गंभीर भडकला आहे.
गौतम गंभीरने सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. ''केएस भरत चांगला यष्टिरक्षक नाही असे कसे म्हणता येईल,'' असे विधान त्याने केले आहे. गंभीर म्हणाला की, ''तुम्ही फक्त ४ सामन्यांमध्ये एखाद्याच्या क्षमतेचे मूल्यांकन कसे करू शकता?'' गावस्कर आणि शास्त्री म्हणाले होते की इंग्लंडच्या परिस्थितीत भरत संघासाठी योग्य पर्याय नाही. राहुलला अंतिम फेरीत यष्टिरक्षक म्हणून खेळवायला हवे.
''भरत हा चांगला यष्टिरक्षक नाही असे म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःकडे बघावे, तो किती वेळ फ्लॉप झाला आणि त्याने कधी धावा केल्या,'' असे गंभीर म्हणाला. कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमी चांगल्या यष्टिरक्षकासोबत जावे लागते. केएल राहुलला अंतिम फेरीत स्थान मिळाले तर ते केवळ त्याच्या फलंदाजीमुळे. तो पुढे म्हणाला की, ''इंग्लंडमध्ये अर्धवेळ यष्टिरक्षक योग्य नाही. या दिग्गजांनी हे समजून घेतले पाहिजे की, सामन्यातील संधी हुकल्याने संपूर्ण सामना बदलू शकतो.''
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामना होणार आहे. गेल्या मोसमातही भारताने फायनल गाठली होती पण न्यूझीलंडकडून संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा स्थितीत यावेळी टीम इंडिया फायनल जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. ७ जूनपासून ओव्हल क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"