Join us  

WTC फायनलच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही; कर्णधार रोहित शर्माचं परखड मत

WTC Final 2023 IND vs AUS : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 6:29 PM

Open in App

ओव्हल : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने अजिंक्यपद पटकावले. भारतीय संघाचा दारूण पराभव झाल्याने कर्णधार रोहित शर्मा सर्वांच्या निशाण्यावर आला आहे. सामन्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रोहित शर्माने विविध बाबींवर भाष्य केले. आयपीएलच्या काही दिवसांनंतर आणि सराव सामने न खेळता या अंतिम सामन्याला आम्हाला सामोरे जावे लागले असल्याचे त्याने सांगितले. तसेच डब्ल्यूटीसीची फायनल खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे परखड मत रोहितने मांडले. 

"जवळपास दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर काही दिवसांतच आणि सराव सामने न खेळता डब्ल्यूटीसी विजेतेपदाची लढत खेळल्यामुळे तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. अशा अंतिम सामन्याची तयारी करण्यासाठी किमान २०-२५ दिवसांची आवश्यकता असते", असे रोहितने सांगितले.

भारताचा दारूण पराभव जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच ऑस्ट्रेलियन संघाने भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने शानदार सुरूवात केली. ट्रॅव्हिस हेड (१६३) आणि स्टीव्ह स्मिथ (१२१) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर कांगारूंनी पहिल्या डावात ४६९ पर्यंत मजल मारली. अजिंक्य रहाणे (८९), शार्दुल ठाकूर (५१) आणि रवींद्र जडेजा (४८) वगळता कोणत्याच भारतीय फलंदाला पहिल्या डावात लय पकडता आली नाही. अखेर २९६ धावांवर टीम इंडिया सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सावध खेळी करत ८ बाद २७० धावांवर डाव घोषित केला. मग भारताला कसोटीत 'अजिंक्य' राहण्यासाठी ४४४ धावांचे मोठे लक्ष्य होते. पण दुसऱ्या डावात देखील भारतीय फलंदाज अपयशी ठरले. अखेरच्या दिवशी स्कॉट बोलंड भारतासाठी काळ ठरला अन् त्याने एकाच षटकात विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने विजयाकडे कूच करत भारताला २३४ धावांवर सर्वबाद करून विजयावर शिक्कामोर्तब केला.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माआयपीएल २०२३भारतीय क्रिकेट संघ
Open in App