नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाने भारताला नमवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला. भारतीय संघाचा दारूण पराभव झाल्याने कर्णधार रोहित शर्मा सर्वांच्या निशाण्यावर आला आहे. सामन्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रोहित शर्माने विविध बाबींवर भाष्य केले. सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे रोहितने सांगितले. भारताच्या पराभवानंतर अनेक माजी खेळाडू प्रतिक्रिया देत आहेत. अशातच भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणनने भारताच्या पराभवानंतर नाव न घेता पाकिस्तानातील टीकाकारांचा समाचार घेतला आहे.
"अचानक शेजारचे माझ्या टाइमलाइनमध्ये प्रवेश करून आनंद साजरा करू लागले आहेत. कारण भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. मी त्यांच्याबद्दल अगदी बरोबर होतो", अशा शब्दांत इरफान पठाणननेपाकिस्तानचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. खरं तर भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानातील काही चाहते टीम इंडियाची खिल्ली उडवत आहेत.
पाकिस्तानातील अभिनेत्री सेहर शिनवारीने देखील ट्विटच्या माध्यमातून खिल्ली उडवली.
ऑस्ट्रेलियाच 'अजिंक्य' जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच ऑस्ट्रेलियन संघाने भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने शानदार सुरूवात केली. ट्रॅव्हिस हेड (१६३) आणि स्टीव्ह स्मिथ (१२१) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर कांगारूंनी पहिल्या डावात ४६९ पर्यंत मजल मारली. अजिंक्य रहाणे (८९), शार्दुल ठाकूर (५१) आणि रवींद्र जडेजा (४८) वगळता कोणत्याच भारतीय फलंदाला पहिल्या डावात लय पकडता आली नाही. अखेर २९६ धावांवर टीम इंडिया सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सावध खेळी करत ८ बाद २७० धावांवर डाव घोषित केला. मग भारताला कसोटीत 'अजिंक्य' राहण्यासाठी ४४४ धावांचे मोठे लक्ष्य होते. पण दुसऱ्या डावात देखील भारतीय फलंदाज अपयशी ठरले. अखेरच्या दिवशी स्कॉट बोलंड भारतासाठी काळ ठरला अन् त्याने एकाच षटकात विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने विजयाकडे कूच करत भारताला २३४ धावांवर सर्वबाद करून विजयावर शिक्कामोर्तब केला.