Ravi Shastri, WTC Final IND vs AUS: भारतीय संघ (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी लंडनला पोहोचला आहे, तिथे ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध केनिंग्टन ओव्हल क्रिकेट ग्राउंडवर 7 ते 11 जून दरम्यान फायनलचा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू सामन्यापूर्वी मेहनत करत आहेत. बीसीसीआयनेही खेळाडूंचे सराव करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले रवी शास्त्री?
माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाचे दीर्घकाळ प्रशिक्षक असलेले रवी शास्त्री यांनी WTC फायनलपूर्वी मोठे वक्तव्य केले आहे. आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची ताकद भारतीय संघात आहे, असा त्यांचा विश्वास आहे. या भारतीय संघात आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची क्षमता असल्याचे या अनुभवी क्रिकेटपटूने म्हटले आहे. टीम इंडियाने वाईट क्रिकेट खेळले असे मी म्हणणार नाही. संघ खूप चांगले क्रिकेट खेळला आहे. पण आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी संघाकडे जे काही हवे ते सारं असूनही भारताला ट्रॉफी मिळवता आली नाही. आताच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत जे आयसीसी ट्रॉफी जिंकू शकतात त्यामुळे नक्कीच या दुष्काळ संपू शकतो, असे महत्त्वाचे विधान त्यांनी केले.
ऑस्ट्रेलियाबद्दल असे सांगितले
ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या शक्यतांबाबत रवी शास्त्री म्हणाले की, प्रत्येकजण म्हणतो की ऑस्ट्रेलिया हा या सामन्यासाठी आवडता संघ आहे कारण टीम इंडिया हा सामना इंग्लंडमध्ये खेळणार आहे, पण तसे नाही. हा फक्त एक कसोटी सामना आहे आणि या फॉरमॅटमधील एक खराब स्पेल तुमच्या जिंकण्याची शक्यता कमी करतो. या सामन्यात ऑस्ट्रेलियालाही सावध राहण्याची गरज आहे.
भारत 12 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीच्या प्रतिक्षेत
टीम इंडियाने शेवटच्या वेळी 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आयसीसी एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. WTC 2021 च्या अंतिम फेरीत टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत संघाला पुन्हा एकदा कसोटीत चॅम्पियन बनण्याची आणि आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची मोठी संधी आहे.