WTC Final 2023 IND vs AUS: 7 जून रोजी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यासाठी चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मेगा मॅचसाठी व्यासपीठ सज्ज होत आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. रोहित सेना आणि कांगारू या दोन्ही संघात एकापेक्षा जास्त मॅचविनर खेळाडू आहेत. अशा स्थितीत एक गोष्ट निश्चित आहे की हा सामना चुरशीचा होणार आहे. त्याचवेळी ओव्हलमध्ये ज्या खेळपट्टीवर सामना रंगणार आहे, त्याचे काही फोटो समोर आले आहेत. खेळपट्टी पाहून इतर कुणाला आनंद होवो अगर न होवो, पण काही खास खेळाडूंना नक्कीच आनंद मिळणार आहे.
खेळपट्टीवर कोणाचा असेल बोलबाला?
डब्ल्यूटीसी फायनल अतिशय हिरव्यागार खेळपट्टीवर होणार. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना गवताने भरलेल्या हिरव्यागार खेळपट्टीवर होणार आहे. खेळपट्टीची काही छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यामध्ये खेळपट्टी कमालीची हिरवीगार दिसत आहे. खेळपट्टी इतकी हिरवीगार आहे की ती खेळपट्टी आहे की मैदानाचा एखादा भाग आहे, हेच समजत नाही अशा मजेशीर कमेंट पाहायला मिळत आहेत. ही खेळपट्टी पाहून फलंदाजांना फार आनंद झाला नसेल पण दुसरीकडे वेगवान गोलंदाजांचा मात्र या खेळपट्टीवर नक्कीच बोलबाला असणार आहे.
भारताचे दोन शिलेदार 'हुकुमी एक्के'
भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना ही खेळपट्टी पाहून खूप आनंद झाला असेल. कारण ढगाळ वातावरणात ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर आहे. येथे चेंडू जोरदार स्विंग होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शमी आणि सिराज दोघेही ऑस्ट्रेलियाची हवा काढू शकतात. एवढेच नाही तर दोघेही जबरदस्त लयीत आहेत. शमी-सिराज फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना त्रास देऊ शकतात.