- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर, लंडन : ट्रॅविस हेडच्या दीडशतकासह स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या विक्रमी शतकानंतरही ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पाचशे धावांच्या आतमध्ये गुंडाळण्यात भारतीयांना यश आले. गुरुवारी कांगारूंचे उर्वरित ७ फलंदाज केवळ १४२ धावांमध्ये बाद करीत भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १२१.३ षटकांत ४६९ धावांमध्ये संपुष्टात आणला. यानंतर भारताची २२ षटकांत ४ बाद ८८ धावा अशी अवस्था करीत कांगारूंनी सामन्यावर घट्ट पकड मिळविली.
कांगारूंनी पहिल्या दिवशी ८५ षटकांत ३ बाद ३२७ धावा केल्या होत्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने १०८ चेंडूंत ४ बळी घेत दमदार मारा केला. मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनीही प्रत्येकी २ बळी घेतले, तर रवींद्र जडेजाने एक बळी मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून हेडने १७४ चेंडूंत २५ चौकार व एका षटकारासह १६३ धावा केल्या. स्मिथने २६८ चेंडूंत १२१ धावांची भक्कम खेळी करताना १९ चौकार मारले. पहिल्या दिवशी ३ बाद ३२७ धावा केलेल्या कांगारूंना दुसऱ्या दिवशी केवळ १४२ धावाच करता आल्या. यामध्ये यष्टिरक्षक-फलंदाज ॲलेक्स कॅरी याने चिवट खेळी करताना ६९ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ४८ धावांची खेळी केली. एका बाजूने कॅरी चांगल्याप्रकारे खेळत असताना दुसऱ्या टोकाकडून फलंदाज बाद झाल्याने कांगारूंना पाचशेचा पल्ला गाठता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी कांगारूंचे शेपूट फार वळवळणार नाही, याची जबाबदारी घेत अखेरच्या क्षणी भेदक मारा केला.
भारताचे शानदार पुनरागमन; पण...
भारतीय गोलंदाजांनी दिलेली झुंज कौतुकास्पद होती. पहिल्या दिवशी सिराज आणि शमीचा अपवाद वगळता भारतीय गोलंदाजी दिशाहीन भासली; पण दुसऱ्या दिवशी भारताने अचूक मारा केला. शमी-सिराज यांच्यासह इतरांनीही दमदार मारा केला. यामुळे नक्कीच ऑस्ट्रेलियाला ५०० धावांचा पल्ला पार करण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. यानंतर ऑस्ट्रेलियानेही शानदार पुनरागमन करताना भारताला चार झटके दिले. ५० धावांतच रोहित, गिल, पुजारा आणि कोहली यांना बाद करीत कांगारूंनी भक्कम पकड मिळविली. ऑस्ट्रेलियाने अक्षरश: आग ओकणारा मारा केला. आता भारतावर मोठा दबाव आला आहे. चार प्रमुख फलंदाज झटपट परतल्याने भारतीय संघ बॅकफूटवर आला आहे.
त्यामुळे हा सामना जितका खेचता येईल, तेवढा खेचला गेला पाहिजे आणि यामध्ये फलंदाजांवर अधिक जबाबदारी असेल. स्मिथने ज्याप्रकारे खेळपट्टीवर उभे राहत वेळ घालवला, तशीच कामगिरी भारतीयांना करावी लागेल. भारताला मोठी भागीदारी करण्याची गरज आहे.
भारतीय फलंदाजांचे लोटांगण
फलंदाजीला उतरलेल्या भारताने आपला अर्धा संघ १४२ धावामध्ये गमावला. कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड, कॅमरून ग्रीन आणि नाथन लियोन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल पाठोपाठच्या षटकांत बाद झाले. यानंतर पुजारा आणि कोहलीही अपयशी ठरल्याने भारताची ४ बाद ७१ धावा: अवस्था झाली. रहाणे आणि जडेजा यांनी पाचव्या गड्यासाठी १०० चेंडूत ७१ धावांची भागीदारी करत भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, लायनने जडेजाला बाद करून ही जोडी फोडली. जडेजाने ५१ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ४८ धावांची शानदार खेळी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रहाणे (२९*) आणि श्रीकर भरत (५*) खेळपट्टीवर होते. भारत अजूनही ३१८ धावांनी मागे आहे.
- इंग्लंडमधील एकाच मैदानावर तीन शतके ठोकणारा स्टीव्ह स्मिथ हा इंग्लंडबाहेरील पाचवा फलंदाज ठरला.
- स्मिथ हा भारताविरुद्ध सर्वाधिक ९ शतके ठोकणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. त्याने रिकी पाँटिंगचा ८ शतकांचा विक्रम मोडला.
- ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतके झळकाविणाऱ्यांमध्ये स्मिथने ३१ शतकांसह तिसरे स्थान पटकाविताना मॅथ्यू हेडनला मागे टाकले. रिकी पाँटिंग (४१) आणि स्टीव्ह वॉ (३२) पहिल्या दोन स्थानांवर कायम.
- भारताविरुद्ध सर्वाधिक ९ कसोटी शतके झळकाविण्याच्या इंग्लंडच्या जो रूटच्या विक्रमाशी स्मिथने केली बरोबरी.
- भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यांत नववे शतक झळकावीत स्मिथने दिग्गज सुनील गावसकर, विराट कोहली आणि पाँटिंग यांचा ८ शतकांचा विक्रम मागे टाकला. सचिन तेंडुलकर सर्वाधिक ११ शतकांसह आघाडीवर.
- डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात एका डावात ४ बळी घेणारा मोहम्मद सिराज हा मोहम्मद शमीनंतरचा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.
- मोहम्मद सिराजने कसोटी क्रिकेटमध्ये ५० बळी पूर्ण केले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : डेव्हिड वॉर्नर झे. भरत गो. शार्दुल ४३, उस्मान ख्वाजा झे. भरत गो. सिराज ०, मार्नस लाबुशेन त्रि. गो. शमी २६, स्टीव्ह स्मिथ त्रि. गो. शार्दुल १२१, ट्रॅविस हेड झे. भरत गो. सिराज १६३, कॅमरून ग्रीन झे. गिल गो. शमी ६, ॲलेक्स कॅरी पायचीत गो. जडेजा ४८, मिचेल स्टार्क धावबाद (अक्षर) ५, पॅट कमिन्स झे. रहाणे गो. सिराज ९, नाथन लियोन त्रि. गो. सिराज ९, स्कॉट बोलँड नाबाद १. अवांतर- ३८. एकूण : १२१.३ षटकांत सर्वबाद ४६९ धावा. बाद क्रम : १-२, २-७१, ३-७६, ४-३६१, ५-३७६, ६-३८७, ७-४०२, ८-४५३, ९-५६८, १०-४६९.
गोलंदाजी : मोहम्मद शमी २९-४-१२२-२; मोहम्मद सिराज २८.३-४-१०८-२; उमेश यादव २५-५-७७-०; शार्दुल ठाकूर २३-४-८३-२; रवींद्र जडेजा १८-२-५६-१.
भारत : रोहित शर्मा पायचीत गो. कमिन्स १५, शुभमन गिल त्रि. गो. बोलँड १३, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. ग्रीन १४, विराट कोहली झे. स्मिथ गो. स्टार्क १४, अजिंक्य रहाणे खेळत आहे १७, रवींद्र जडेजा खेळत आहे ८. अवांतर- ७. एकूण : २२ षटकांत ४ बाद ८८ धावा. बाद क्रम : १-३०, २-३०, ३-५०, ४-७१.
गोलंदाजी : मिचेल स्टार्क ५-०-२५-१ , पॅट कमिन्स ८-२-३५-१ , स्कॉट बोलँड ६-३-१२-१ , कॅमरून ग्रीन ३-०-१४-१