WTC Final 2023 : भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव पत्करावा लागला. भारताच्या पहिल्या डावातील १०९ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १९७ धावा केल्या. पण, दुसऱ्या डावातही भारताची हाराकिरी दिसली आणि चेतेश्वर पुजाराच्या ५९ धावा असूनही भारताला १६३ धावाच करता आल्या. ७६ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १ विकेटच्या मोबदल्यात पार केले आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत एन्ट्री मारली. आता भारताची अडचण झाली. अशा वेळी केन विलियम्सनचा न्यूझीलंड संघ भारताच्या मदतीला आला आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जूनपासून ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. भारताला अहमदाबाद कसोटी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली किंवा २-२ अशी बरोबरीत सुटली तर भारताला न्यूझीलंड-श्रीलंका मालिकेतील निकालावर अवलंबून राहावे लागेल. अशा स्थितीत श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांपैकी किमान एक तरी सामना हरावा, अशी प्रार्थना भारताला करावी लागेल.
न्यूझीलंडने या मालिकेसाठी तगडा संघ जाहीर केला आहे. नुकत्याच इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने १ धावेने रोमहर्षक विजय मिळवला होता. तोच संघ किवींनी कायम राखला आहे. न्यूझीलंडने ही मालिका जिंकल्यास भारताचा अंतिम फेरीचा मार्ग मोकळा होईल. किवींचा फॉर्म पाहता श्रीलंकेला ही मालिका जिंकता येणे अवघड आहे आणि असे झाल्यास भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल होईल आणि त्यात रोहित अँड टीम दम दाखवेल.
न्यूझीलंडचा संघ - टीम साऊदी ( कर्णधार), टॉम ब्लंडल, मिचेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, मॅच हेन्री, टॉम लॅथम, डॅरील मिचेल, ब्लेअर टिकनर, नील वॅगनर, स्कॉट कुगेलयन, हेन्री निकोल्स, केन विलियम्सन, विल यंग ( New Zealand Test squad: Tim Southee (c), Tom Blundell (wk), Michael Bracewell, Devon Conway, Matt Henry, Tom Latham, Daryl Mitchell, Blair Tickner, Neil Wagner, Scott Kuggeleijn, Henry Nicholls, Kane Williamson, Will Young)
श्रीलंकेचा संघ - दिमुथ करुणारत्ने ( कर्णधार), ओशादा फर्नांडो, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यू, धनंजया डी सिल्वा, दिनेश चंडीमल, कमिंदू मेंडिस, निरोशान डिकवेला, निशान मदुष्का, रमेश मेंडिस, प्रभात जयसुर्या, चमिका करुणारत्ने, कसुन रजिथा, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो, विस्वा फर्नांडो, मिलन राथनायके.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"