Ravi Shastri reveals best combined India-Australia Test XI - भारतीय संघाची एक तुकडी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या ( WTC Final 2023) तयारीसाठी आज लंडनला दाखल झाली. इंडियन प्रीमिअर लीग २०२३ नंतर संघातील अन्य खेळाडूही येथे दाखल होतील. ७ ते ११ जून या कालावधीत लंडनच्या ओव्हल मैदावर भारत-ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS) असा फायनल सामना रंगणार आहे. त्यासाठी टीम इंडिया तयारीला लागली आहे. पण, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारत-ऑस्ट्रेलियाची मिळून एक प्लेइंग इलेव्हन निवडली आहे आणि त्यात फक्त चार भारतीय खेळाडूंना त्यांनी स्थान दिले आहे.
आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी ही प्लेइंग इलेव्हन निवडली. दोन्ही संघांतून अंतिम ११ खेळाडू निवडणे हे खूप अवघड काम होते, कारण दोन्ही संघांत अव्वल दर्जाचे खेळाडू असल्याचे मत शास्त्री यांनी व्यक्त केले. शास्त्री यांनी संघाचे नेतृत्व रोहित शर्मा याच्याकडेच कायम ठेवले असले तरी ७ ऑस्ट्रेलियन खेळाडूंची निवड करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ''मी रोहित शर्माला कर्णधारपद देईन, कारण त्याच्याकडे पॅट कमिन्सपेक्षा जास्त अनुभव आहे. तो बऱ्याच वर्षापासून संघासोबत आहे आणि नेतृत्व करतोय. पण, जर स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असता, तर माझी निवड कदाचित वेगळी असती. पॅट आणि रोहित यांच्यात रोहित बाजी मारतो,'' असे शास्त्री म्हणाले.
रोहितसोबत सलामीवीर म्हणून उस्मान ख्वाजाची निवड केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डेव्हिड वॉर्नर या संघात नाही, तर भारताचा उगवता तारा शुबमन गिलही यातून बाद आहे. २०२१-२३ च्या WTC स्पर्धेत इंग्लंडचा स्टार जो रूट याच्यानंतर सर्वाधिक धावा ख्वाजाच्या नावावर आहेत. कौंटी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करत असलेल्या चेतेश्वर पुजाराला या संघात स्थान दिले गेलेले नाही. त्याच्याजागी मधल्या फळीत मार्नस लाबुशेन व स्टीव्ह स्मिथ यांना निवडले गेले आहे. रोहित व्यतिरिक्त विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी हे भारतीय शास्त्री यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत.
रवी शास्त्री यांची IND-AUS कसोटी प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा ( कर्णधार), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, रवींद्र जडेजा, अॅलेक्स केरी ( यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लाएन, मोहम्मद शमी ( Ravi Shastri combined India-Australia Test XI: Rohit Sharma (c), Usman Khawaja, Marnus Labuschagne, Virat Kohli, Steve Smith, Ravindra Jadeja, Alex Carey (wk), Pat Cummins, Mitchell Starc, Nathan Lyon, Mohammad Shami)