WTC Final 2023 : भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी स्पर्धेत विजेतेपद मिळवून एक दशक उलटले आहे. टीम इंडियाने २०१३ मध्ये ( चॅम्पियन्स ट्रॉफी ) अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली होती आणि ती महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली. तेव्हापासून भारतीय संघ अनेकवेळा आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम व उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आहे, पण एकदाही चॅम्पियन बनू शकला नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मते आयसीसी ट्रॉफी जिंकणे अजिबात सोपे नाही, महेंद्रसिंग धोनीने ते खूप सोपे केले होते.
लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलदरम्यान रवी शास्त्री यांनी हे वक्तव्य केले. रवी शास्त्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ( २००७), वन डे वर्ल्ड कप ( २०११) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीनंतर विराट कोहलीने दीर्घकाळ टीम इंडियाचा कर्णधार होता. तरी आयसीसी ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला कोणतेही मोठे यश मिळवता आले नाही. त्याचवेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला आयसीसीच्या बाद फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
भारतीय क्रिकेट संघाला सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धही संघाची निराशा झाली होती. दोन्ही फायनलमध्ये टीम इंडियाची कामगिरी अत्यंत खराब होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडच्या शतकांच्या जोरावर ४६९ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाला केवळ २९६ धावा करता आल्या.
शिवाय दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सवर २७० धावा करून डाव घोषित केला, त्यामुळे टीम इंडियाला ४४४ धावांचे लक्ष्य मिळाले पण संघ २३४ धावांवर गडगडला.