- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
लंडन : ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात भारताविरुद्ध सावध सुरुवात करताना पहिल्या दिवशी ८५ षटकांमध्ये ३ बाद ३२७ धावा केल्या. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळालेल्या कांगारूंनी सुरुवातीला बसलेल्या धक्क्यानंतर आपला डाव सावरण्यात यश मिळवले. ट्रॅविस हेडने दमदार नाबाद शतक, तर स्टीव्ह स्मिथने नाबाद अर्धशतक झळकावत कांगारूंना पुनरागमन करून दिले. स्मिथ-हेड यांच्या नाबाद द्विशतकी भागिदारीमुळे भारताने सामन्यावरील पकड गमावली.
ट्रॅविस हेडने १५६ चेंडूंत २२ चौकार व एका षटकारासह नाबाद १४६ धावा केल्या. दुसरीकडे, स्मिथने एक बाजू लावून धरत भारतीय गोलंदाजांची परीक्षा घेतली. त्याने २२७ चेंडूंत १४ चौकारांसह नाबाद ९५ धावा केल्या. सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळत असलेल्या भारतीयांनी चहापानापर्यंत कांगारूंना ५१ षटकांत ३ बाद १७० असे रोखले होते. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटाने प्रत्येकी एक बळी घेत भारताला पकड मिळवून दिली. धोकादायक सलामीवीर उस्मान ख्वाजाला शून्यावर बाद करत सिराजने भारताला मोठे यश मिळवून दिले होते. यानंतर डेव्हिड वॉर्नरने मार्नस लाबुशेनसोबत दुसऱ्या गड्यासाठी १०८ चेंडूंत ६९ धावांची भागीदारी केली. ही जोडी जड ठरणार असे दिसत असताना ‘लॉर्ड’ शार्दूल भारतासाठी धावून आला आणि त्याने वॉर्नरला झेलबाद केले. वॉर्नरने ६० चेंडूंत ८ चौकारांसह ४३ धावांची खेळी केली.
यानंतर दोन षटकांनी मोहम्मद शमीने लाबुशेनला त्रिफळाचीत केले. लाबुशेनने ६२ चेंडूंत ३ चौकारांसह २६ धावांची चिवट खेळी केली. येथून भारत वर्चस्व गाजवणार असे दिसत असताना स्मिथ आणि हेड ही जोडी जमली. दोघांनी चहापानापर्यंत १६४ चेंडूंत नाबाद ९४ धावांची भागीदारी केली. सुरुवातीला काहीसा चाचपडत खेळलेल्या हेडने जम बसल्यानंतर आक्रमक फटके मारले. त्याने स्मिथसह चौथ्या गड्यासाठी ३७० चेंडूंत नाबाद २५१ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला भक्कम स्थितीत आणले.
स्मिथ-हेड यांना बाद करण्यासाठी भारतीयांना बराच घाम गाळावा लागला. हेड आखूड टप्प्यांच्या काही चेंडूवर चाचपडला; परंतु नशिबाची साथ लाभल्याने तो तंबूत परतला नाही. अनुभवी रविचंद्रन अश्विनच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या रवींद्र जडेजाने कांगारूंना फटकेबाजीची फारशी संधी दिली नाही. त्याने ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला काही प्रमाणात रोखले खरे; मात्र बळी घेण्यात तो अपयशी ठरला.
आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथने आपला सर्व अनुभव पणास लावला. स्मिथ हेडला सल्ले देताना दिसला. आखूड चेंडूवर चाचपडणाऱ्या हेडला स्मिथ सतत धीर देताना दिसला. संधी मिळताच स्मिथने काही अप्रतिम फटके मारत दमदार अर्धशतक झळकावले.
अनोखे अर्धशतक
भारताचा कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने मैदानात पाऊल टाकताच एका विक्रमाची नोंद केली. त्याने कारकिर्दीत ५० कसोटी सामने खेळण्याचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो ३६ वा भारतीय क्रिकेटपटू ठरला. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याचाही हा ५० वा कसोटी सामना ठरला. त्यामुळे या अनोख्या अर्धशतकाची मोठी चर्चा रंगली.
कोहली, रोहितने मोडला धोनीचा विक्रम
- सर्वाधिक आयसीसी अंतिम सामना खेळण्याच्या बाबत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कामगिरी मागे टाकली. धोनीने आपल्या कारकिर्दीत पाच आयसीसी अंतिम सामने खेळले.
- कोहली-रोहित यांनी बुधवारी डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या रुपाने सहावा आयसीसी अंतिम सामना खेळला. भारताकडून युवराज सिंगने सर्वाधिक सात वेळा आयसीसी अंतिम सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे.
दोन्ही संघांच्या खेळाडूंनी बांधल्या काळ्या पट्ट्या
नाणेफेकीनंतर भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मैदानात उतरले. यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आपल्या हातावर काळ्या पट्ट्या बांधल्याचे दिसून आले. भारतासह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही बिहारमधील भीषण अपघातात प्राण गमावलेल्या मृतांना आदरांजली म्हणून ही पट्टी बांधली होती. या अपघातामध्ये सुमारे २५० हून अधिक प्रवाशांनी प्राण गमावला होता. तसेच, यावेळी खेळाडूंनी दोन मिनिटे मौन बाळगून मृतांना श्रद्धांजलीही वाहिली.
अश्विनला वगळण्याचा निर्णय ठरू शकतो महागडा
- या सामन्याआधी, भारताच्या संघ निवडीवर बरीच चर्चा झाली. अश्विनला वगळण्यात आल्याने सर्वांनाच धक्का बसला. मात्र, परिस्थितीनुसार निर्णय घेत शार्दुल ठाकूरच्या रुपाने अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संघात स्थान देताना अश्विनला बाहेर बसविण्यात आले.
- गेल्या काही वर्षांपासून अश्विनला विदेशात फारसे खेळवण्यात आले नसल्याचे दिसून आले आहे. मायदेशात नक्कीच तो भारताचा यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याला संघाबाहेर बसवणे योग्य आहे की, नाही हे आत्ताच सांगणे कठीण आहे. पण, सामन्याची सद्यस्थिती पाहता हा निर्णय महागात पडू शकतो, असे वाटते.
- फिरकी गोलंदाज म्हणून जडेजा संघात आहे. पण बळी घेणारा गोलंदाज म्हणून अश्विनला पहिली पसंती देणे योग्य ठरले असते. सामन्याआधी दोन फिरकी गोलंदाज खेळवले जातील, असेच म्हटले जात होते. पण, एकाच फिरकीपटूसह खेळण्याचा निर्णय ऐनवेळी घेतल्याचे दिसून येत आहे. कारण, हवामानातही बराच बदल होत होता. कधी ढगाळ वातावरण, तर कधी स्वच्छ सूर्यप्रकाश होते. त्यामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मासाठी अंतिम संघाचा निर्णय घेणे सोपे नव्हते.
धावफलक
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर झे. भरत गो. शार्दुल ४३, उस्मान ख्वाजा झे. भरत गो. सिराज ०, मार्नस लाबुशेन त्रि. गो. शमी २६, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे ९५, ट्रॅविस हेड खेळत आहे १४६. अवांतर - १७. एकूण : ८५ षटकांत ३ बाद ३२७ धावा.
बाद क्रम : १-२, २-७१, ३-७६.
गोलंदाजी : मोहम्मद शमी २०-३-७७-१; मोहम्मद सिराज १९-४-६७-१; उमेश यादव १४-४-५४-०; शार्दुल ठाकूर १८-२-७५-१; रवींद्र जडेजा १४-०-४८-०.
Web Title: wtc final 2023 smith and head down indians double hundred partnership
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.