डब्ल्यूटीसी फायनल इंग्लंडच्या द ओव्हलवर ७ जूनपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. टीम इंडिया दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार असून प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया असल्याने क्रिकेट विश्वाचे सामन्याकडे लक्ष असेल. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला डब्ल्यूटीसी फायनलच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्याची मागणी केली.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी संवाद साधताना शास्त्री यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'कोहलीला पुन्हा एकदा टीम इंडियाचा कर्णधार म्हणून पाहायला आवडेल. गतवर्षी बर्मिघममध्ये झालेल्या कसोटी सामन्यात रोहितला दुखापत झाली तेव्हा कर्णधार म्हणून माझी पसंत विराट कोहली होता. मला वाटले विराटच नेतृत्व करेल. पण जसप्रीत बुमराहला कसोटी सामन्याचे कर्णधार बनवले. त्यावेळी कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याची गरज होती, त्याच्याच नेतृत्वात आपण इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती.'
'मी तिथे असतो तर नक्कीच कोहलीला कर्णधारपद देण्याबाबत व्यवस्थापनासोबत चर्चा केली असती. राहुल द्रविड असाच विचार करीत असावेत असा मला विश्वास आहे. आयपीएलमध्ये कोहली काळजीवाहू कर्णधार म्हणून जबरदस्त कामगिरी करीत आहे. खूप शांत असून अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. त्याच्यातील उत्साह पाहून मला आनंद झाला,' असे शास्त्री यांनी म्हटले आहे.