आयपीएलनंतर आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष आता जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपकडे लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ ७ जूनपासून सुरू होणाऱ्या या अंतिम सामन्यात आमने-सामने येणार आहेत. भारतीय संघ सलग दुसऱ्यांचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्यांदाच अंतिम सामन्यात खेळणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे. तसेच या सामन्यासाठीचे पंच आणि सामनाधिकाऱ्यांची घोषणा आयसीसीने केली आहे. दरम्यान, इंग्लंडमधील लहरी हवामानाचा विचार करता या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात पाऊस पडल्यास काय होणार, असा प्रश्न क्रिकेट प्रेमींना पडला आहे.
भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी इंग्लंडमध्ये जाऊन सरावास सुरुवात केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा नुकताच इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. तर विराट कोहली आधीच इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. अंतिम सामन्यासाठी इंग्लंडचे रिचर्ड इंगिलवर्थ आणि न्यूझीलंडचे ख्रिस गॅफने हे मैदानावरील पंच असतील. इंग्लंडचे रिचर्ड कॅटलबेरो सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून काम पाहतील. त्यांची तिसरे पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. तर कुमार धर्मसेना चौथे पंच असतील. वेस्ट इंडिजचे रिची रिचर्डसन ,सममनाधिकारी म्हणून काम पाहतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी १२ जून हा अतिरिक्त दिवस निश्चित करण्यात आला आहे. सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास या दिवशी खेळ खेळवला जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये खेळवला जाणारा डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. तसेच डिस्नी हॉटस्टारवरही थेट प्रसारण होईल.