भारताचा ऑलराऊंडर शार्दुल ठाकुरने ऑस्ट्रेलियाविरोधात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप सामन्याच्या पिचवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. WTC Final साठी जे पिच बनविण्यात आले होते, ते पूर्ण पणे खेळण्यासाठी तयार नव्हते असा दावा शार्दुलने केला आहे. हे पिच २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या मॅचपेक्षा एकदम वेगळे आहे, असे तो म्हणाला आहे.
भारताने २०२१ मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. तेव्हा ओव्हलवर यजमान देशाच्या टीमला भारताने १५७ रन्सनी हरविले होते. शार्दुलने या खेळपट्टीवर दोन्ही डावांत अर्धशतक झळकविले होते. आता याच पिचवर शार्दुलने तीन तास बॅटिंग केली, अर्धशतकही ठोकले, त्याच पिचवर ऑस्ट्रेलियाच्या दोन बॅट्समननी शतकही झळकावले आहे. असे असताना शार्दुल असे का म्हणाला, ते पाहुयात...
शार्दुलने भलेही ओव्हलच्या मैदानावर अर्धशतक झळकावले, परंतू असमान उसळी असल्यामुळे त्याच्या हाताला दोनदा बॉल लागला आहे. अजिंक्य रहाणेसोबत १०९ रन्सची महत्वाची भागीदारी करताना भारताला २९६ च्या स्कोअरवर नेण्यास त्याचा सिंहाचा वाटा आहे.
खेळपट्टी खूप वेगळी दिसते. गेल्या वेळी आम्ही ओव्हलवर कसोटी खेळलो तेव्हा खेळपट्टी मदत करत होती. इंग्लंडमध्ये ढगाळ वातावरण असेल तर चेंडू नक्कीच स्विंग होईल, हे सर्वांना माहीत होते. पूर्वी, खेळ पुढे जात असताना खेळपट्टी सपाट ठेवण्यासाठी संघ रोलर्सचा वापर करत होते. मात्र यावेळी तसे काही दिसत नाही. मला असे वाटते की खेळपट्टी सामन्यासाठी पूर्णपणे तयार नाही. तिसऱ्या दिवशीही काही चेंडू वर जात होते तर काही खाली राहिले होते, असे शार्दुल म्हणाला.
गुड लेंथवर पडल्यानंतर एका टोकाकडून चेंडू वेगाने वर येत होता आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी त्याचा चांगला उपयोग केला. एक दिवस आधीचा खेळ पाहिला तर खेळपट्टीचा मूड बदलला आहे. चेंडू सोडायचा की खेळायचा हे ठरवण्यात फलंदाजांना त्रास होत होता, परंतू बहुतांशवेळा फलंदाजाला तो चेंडू खेळणे भाग पडत आहे, असे शार्दुल म्हणाला.