- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
लंडन : 'द ओव्हल' स्टेडियममध्ये ७ जूनपासून रंगणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. या दोन्ही संघांमध्ये स्टार खेळाडूंचा भरणा असल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा आहेत, तर ऑस्ट्रेलिया संघात कर्णधार पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, उस्मान ख्वाजा यांचा समावेश आहे.
दोन्ही संघ समतोल आहेत; पण या अंतिम सामन्यात सर्वांची नजर असेल ती भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल याच्या कामगिरीवर. त्याने गेल्या एक वर्षात जे काही कमालीचे सातत्य दाखवले आहे, त्यावरून तो क्रिकेटविश्वातील भविष्यातील दिग्गज खेळाडू म्हणून नावारूपाला येत आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये गिलने आपली छाप पाडली आहे. त्यामुळेच आता गिल भारतीय क्रिकेटच्या महान फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवणार का, याची उत्सुकता लागली आहे. भारताने क्रिकेटविश्वाला एकाहून एक सरस फलंदाज दिले आहेत. विजय मर्चंट, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली अशी कितीतरी नावे गाजली. त्यामुळे पुढचा भारतीय दिग्गज म्हणून गिल स्थान मिळवणार का? हे स्थान मिळवण्याची त्याची पूर्ण क्षमता नक्कीच आहे.
आयपीएलमध्ये गिलने आक्रमक पवित्रा घेत फलंदाजी केली. तसेच यासोबतच त्याने फलंदाजीतील उच्च तंत्रही दाखवून दिले. शिवाय त्याच्या खेळीमध्ये एक वेगळीच सुंदरता आहे, ज्याचा प्रेक्षकांनी खूप आनंद घेतला. त्यामुळेच भारताच्या समृद्ध फलंदाजीचा वारसा पुढे घेऊन जाण्याची क्षमता गिलमध्ये आहे, असे म्हटले जात आहे. मात्र, असे असले, तरी डब्ल्यूटीसी अंतिम सामना त्याच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान ठरणार आहे. गिलला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हा अंतिम सामना अत्यंत महत्त्वाचा ठरेल. असे नाहीए की, डब्ल्यूटीसी फायनलमध्ये अपयशी ठरल्यास त्याला नाकारण्यात येईल, पण या प्रकारचा सामना सर्वांत मोठी संधी ठरत असते. मोठे फलंदाज अशाच सामन्यात दमदार खेळ करतात.
सुनील गावसकर यांचे उदाहरण घेता येईल. गावसकर यांनी १९७१ मध्ये पदार्पण केल्यापासूनच खोऱ्याने धावा केल्या आहेत. १९७५-७६ मध्ये वेस्ट इंडीजमध्ये भारताला विजयी करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले होते. सचिन तेंडुलकरबाबत सांगायचे तर, १९९१-९२ मध्ये ऑस्ट्रेलियातील त्याची कामगिरी कमालीची ठरली होती. विराट कोहलीनेही २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये दमदार फलंदाजी करत सर्वांना प्रभावित केले होते. शुभमन गिलही अशीच छाप डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पाडणार का? ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचे गिलपुढे आव्हान असेल, पण हे आव्हान त्याने यशस्वीपणे पेलले तर नक्कीच त्याची गणना दिग्गज फलंदाजांमध्ये होईल.