साऊथम्पटन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान विश्व कसोटी चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनलच्या चौथ्या दिवशी सोमवारी पावसामुळे खेळ शक्य झाला नाही. भारताच्या पहिल्या डावातील २१७ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात २ बाद १०१ धावांची मजल मारली होती. तिसऱ्या दिवशीही बाह्य मैदान ओले असल्यामुळे खेळाला उशिरा सुरुवात झाली होती आणि अंधुक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवावा लागला होता.
पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ शक्य झाला नाही तर, दुसऱ्या दिवशी ६४.४ षटकांचा खेळ झाला. अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात जास्तीत जास्त वेळ खेळ शक्य झाला नाही.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी सहाव्या दिवसाचा उपयोग करेल. कारण सामन्यात आतापर्यंत केवळ १४१.१ षटकांचा खेळ शक्य झाला. जर सामना अनिर्णीत संपला तर उभय संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल.
इंग्लंडमध्ये सर्वाधिक बळी
ईशांतने इंग्लंडमध्ये ४४ बळी घेतले आहेत. तो इंग्लंडमधील सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने आतापर्यंत १३ सामन्यांच्या २० डावात ४४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दोन वेळा एका डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. ईशांतने कपिल देव यांना मागे टाकले. कपिल देव यांनी इंग्लंडमध्ये ११ सामन्यांच्या २२ डावांमध्ये ४३ बळी घेतले.
विदेशात कसाेटीत २०० बळी
ईशांत शर्माच्या विदेशात कसोटीत २०० बळी पूर्ण झाले आहेत. असे करणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला. ईशांतने ६१ सामन्यात २०० बळी घेतले आहेत. त्याने ९ वेळा पाच आणि एकदा १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. ७४ धावांत ७ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी. याशिवाय कुंबळे (२६९), कपिल देव (२१५) आणि झहीर खान (२०७) यांनीही विदेशात २०० हून अधिक बळी घेतले.
तिकिटे कमी किमतीत
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात पावसाचा व्यत्यय सुरूच आहे. खराब हवामानामुळे भारत आणि न्यूझीलंड संघाला बराच वेळ विश्रांती घेण्यापासून पर्याय नसल्याचे चित्र आहे. सामन्यासाठी बुधवार हा सहावा दिवस राखीव ठेवण्यात आला असून, या दिवसाची तिकिटे कमी किमतीत विकण्याचा निर्णय आयसीसीने सोमवारी घेतला.