WTC Final India vs Australia : भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभूत व्हावे लागले. २०२१मध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताने दोन वर्षांत कसोटी क्रिकेट गाजवले, परंतु आज WTC Final मध्ये पुन्हा अपयश आले. ४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ २३४ धावांत तंबूत परतला आणि ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी विजय मिळवून ट्रॉफी जिंकली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर उभा केला अन् भारताचा पहिला डाव २९६ धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात ८ बाद २७० धावांवर डाव घोषित करून भारतासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना आघाडीचे तिन्ही फलंदाज पुन्हा ढेपाळले. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी संघर्ष केला. स्कॉट बोलंडने टाकलेल्या ४७व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर घात झाला.
विराट ७८ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावांवर बाद झाला अन् अजिंक्यसह त्याची ८६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. रवींद्र जडेजाही ( ०) भोपळ्यावर बाद झाला. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर अजिंक्य ७ चौकारांच्या मदतीने ४६ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर नॅथन लिएनने फास आवळला. श्रीकर भरत २३ धावांवर बाद झाला. नॅथनने ४, बोलंडने तीन विकेट्स घेतल्या.
राहुल द्रविड काय म्हणाला?लक्ष्य आव्हानात्मक होते. पण हा संघ नेहमीच कडवी टक्कर देत आला आहे. त्यामुळे याही सामन्यात आशा होत्या. दोन दिवस आम्ही सामन्यात खूप मागे होतो, परंतु पुढच्या दोन दिवसांत आम्ही कमबॅक केले. ऑस्ट्रेलियाने आज पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी केली... ४६९ चा हा विकेट नव्हता... आम्ही अधिक धावा दिल्या आणि ते खूप निराशाजनक होते. ट्रॅव्हिस हेडने गोलंदाजांच्या चूकीचा फायदा उचलला...
टॉस जिंकून गोलंदाजी घेण्याच्या निर्णयाचे राहुलने समर्थन केले... मैदानावर गवत होते.. इंग्लंडमध्ये चौथ्या व पाचव्या दिवशी फलंदाजी करणे सोपं असतं... अनेक संघ इंग्लंडमध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाला आम्ही ३०० पर्यंत रोखले असते तर ही मॅच अटीतटीची झाली असती... त्यांनी आम्ही धावा करण्याची संधी दिली. ४४४ या खूप मोठ्या धावा असतात, पण आम्हाला अपेक्षा होत्या.
मागील चार वर्षांत टॉप ऑर्डर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आलेली नाही, यावर सौरव गांगुलीने लक्ष वेधले असता राहुल द्रविड म्हणाला, आमच्याकडे चांगले फलंदाज आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियात विजय मिळवले आहेत, इंग्लंडमध्ये जिंकून दाखवलं आहे. पण, हा खरंय की त्यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचवेळी खेळपट्टीचीही महत्त्वाची भूमिका असते आणि त्याकडे पाहता सर्वच संघाच्या स्टार फलंदाजाची सरासरी कमी झालेली आहे.