WTC Final India vs Australia : ऑस्ट्रेलियाने उत्तम सांघिक कामगिरी करताना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकली. भारतीय संघावर त्यांनी २०९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर उभा केला अन् भारताचा पहिला डाव २९६ धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचीही सुरुवात काही खास झाली नाही, परंतु त्यांनी ८ बाद २७० धावांवर डाव घोषित करून भारतासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना विराट आणि अजिंक्य यांनी संयमी खेळ केला. बोलंडने टाकलेल्या ४७व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर घात झाला. विराट ७८ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावांवर बाद झाला अन् अजिंक्यसह त्याची ८६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. रवींद्र जडेजाही ( ०) भोपळ्यावर बाद झाला. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर अजिंक्य ७ चौकारांच्या मदतीने ४६ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर नॅथन लिएनने फास आवळला. श्रीकर भरत २३ धावांवर बाद झाला. भारताचा संपूर्ण संघ २३४ धावांत माघारी परतला अन् ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी विजय मिळवताना WTC Final जिंकली. नॅथनने ४, बोलंडने तीन विकेट्स घेतल्या.
रोहित शर्मा काय म्हणाला?
नाणेफेक जिंकून आम्ही चांगली सुरूवात केली असे वाटले... पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी केली. पण, तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला श्रेय द्यायला हवे. विशेषतः ट्रॅव्हिस हेड याचे कौतुक... आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मी गोलंदाजीत प्रयोग करून पाहिले, परंतु ते यशस्वी ठरले नाही. ऑस्ट्रेलियाने सर्वच आघाड्यांवर चांगली कामगिरी केली. अजिंक्य रहाणे व शार्दूल ठाकूर यांनी पहिल्या डावात चांगली भागीदारी करून आम्हाला सामन्यात आणले... आम्ही दुसऱ्या डावात चांगली गोलंदाजी केली, परंतु पुन्हा फलंदाजीत अपयशी ठरलो.
आम्ही चार वर्ष प्रचंड मेहनत घेतली... दोन फायनल खेळलो.. दोन वर्षांनी कसोटी चॅम्पियनशीप आली, परंतु एका पराभवामुळे तुम्ही दोन वर्षांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. पुढच्या WTC साठी तयारीला सुरुवात करा, असे रोहित म्हणाला.
Web Title: WTC Final IND vs AUS : Rohit Sharma said, "we'll keep our heads high and prepare for the next WTC Final".
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.