WTC Final India vs Australia : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल पाचव्या दिवशी निर्णायक वळणावर आली आहे. भारतीय संघाला विजयासाठी २८० धावा आज करायच्या आहेत आणि विराट कोहली व अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी मैदानावर उभी आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला WTC ट्रॉफी उंचावण्यासाठी ९० षटकांत ७ विकेट्स काढायच्या आहेत. या कसोटीत दोन्ही संघांना विजयाची संधी आहे, परंतु जर ही मॅच ड्रॉ झाली तर काय?
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर उभा केला अन् भारताचा पहिला डाव २९६ धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचीही सुरुवात काही खास झाली नाही, परंतु त्यांनी ८ बाद २७० धावांवर डाव घोषित करून भारतासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. शुबमन गिलचा वादग्रस्त झेल, यामुळे कसोटीचा तिसरा दिवस चर्चेत राहिला. विराट व अजिंक्यने भारताचा डाव सावरून चौथ्या दिवसअखेर ३ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताला आजच्या दिवसात विजयासाठी आणखी २८० धावा करायच्या आहेत.
ओव्हलवरील सामन्यात निकाल अपेक्षित आहे, परंतु मॅच ड्रॉ राहिल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाईल आणि बक्षीस रकमेची समान विभागणी केली जाईल. या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवला गेला आहे, परंतु सद्यपरिस्थितीत मॅच सहाव्या दिवशी खेळवावी लागेल, याची शक्यता कमीच आहे. कसोटीच्या पहिल्या तीन दिवसांत पावसाने व्यत्यय आणला असता तर मॅच राखीव दिवशी खेळवली गेली असती.
आज ओव्हल येथे पावसाची शक्यता आहे, पण आज १ तास अतिरिक्त खेळ खेळवला जाईल. १ तासापेक्षा जास्त वेळ वाया गेल्यास राखीव दिवसात उर्वरित मॅच होईल.