विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या लढतीनंतर भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ४ ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी भारतीय खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी मिळाली आहे आणि या सुट्टीत खेळाडू कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये भटकंती करताना दिसत आहेत.
रोहित शर्मा व मयांक अग्रवाल यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भटकंतीचे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात ते कुटुंबीयांसोबत दिसत आहेत. रोहित शर्मानं त्याच्या इंस्टाग्रामवर पत्नी रितिका आणि मुलगी समायरा यांचे फोटो पोस्ट केला आहे त्यात त्या दोघी लॉस्ट किंगडम पार्कमध्ये दिसत आहेत. दुसरीकडे मयांक पत्नीसह ब्राइटन पॅलेसच्या बाहेर दिसत आहे.
बीसीसीआयच्या माहितीनुसार काही खेळाडू विम्बल्डन स्पर्धेचे सामने पाहायला जातील, तर काही खेळाडू यूरो चषक फुटबॉल स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी जाणार आहेत. या सर्व खेळाडू व कुटुंबीयांना पुन्हा १४ जुलैपर्यंत बायो बबलमध्ये दाखल व्हावे लागणार आहे.