WTC फायनल यशोशिखर: राहुल द्रविड, कठोर मेहनतीच्या बळावर गाठली अंतिम फेरी

डब्ल्यूटीसी फायनल जिंकू शकलो तर भारतीय संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 09:18 AM2023-06-06T09:18:47+5:302023-06-06T09:19:41+5:30

whatsapp join usJoin us
wtc final success says rahul dravid through hard work reached the final | WTC फायनल यशोशिखर: राहुल द्रविड, कठोर मेहनतीच्या बळावर गाठली अंतिम फेरी

WTC फायनल यशोशिखर: राहुल द्रविड, कठोर मेहनतीच्या बळावर गाठली अंतिम फेरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विशेष प्रतिनिधी, लाेकमत न्यूज नेटवर्क, लंडन : ‘भारतीय संघाने गेली दोन वर्षे कसोटीत जे यश मिळविले, जी मेहनत घेतली, त्यामुळे आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकलो. डब्ल्यूटीसी फायनल म्हणजे यशोशिखर. हे शिखर गाठण्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत,’ असे संघाचे मुख्य कोच राहुल द्रविड यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

गेल्या पाच- सहा वर्षांत भारतीय संघ जेथे कुठे खेळला तेथे यशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात आणि मायदेशातही भारताने पराभूत केले. काही सकारात्मक गोष्टींमुळे हे यश साध्य होऊ शकले.  आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला नमवून पहिल्या वहिल्या जेतेपदाची चव चाखण्याची संधी चालून आलेली आहे. या सामन्याच्या निमित्ताने भारतीय संघ कसोटीत कुठे उभा आहे, हे पडताळून पाहण्याचीदेखील संधी असेल, असे द्रविड म्हणाले.

भारताने २०११ ला अखेरचा वन डे विश्वचषक जिंकला. तेव्हापासून अनेकदा बाद फेरीत धडक देऊनही भारताला जेतेपदाचा चषक उंचाविता आलेला नाही.  २०२१ च्या पहिल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाला. मात्र यावेळी अनेक वर्षांपासूनचा आयसीसी स्पर्धा न जिंकण्याचा दुष्काळ संपविता येईल? द्रविड म्हणाले, ‘तुमच्याकडे आयसीसी चषक असेल, तर वेगळा मान मिळतो.  डब्ल्यूटीसी फायनल जिंकू शकलो तर भारतीय संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाईल.’

इंग्लंडमध्ये जून महिन्यात होत असलेल्या या कसोटी सामन्याबाबत द्रविड म्हणाले, ‘याआधी जून महिन्यात आम्ही इंग्लंडमध्ये बऱ्यापैकी क्रिकेट खेळलेलो नाही. जुलै महिन्यापासून येथे खेळण्याचा अनुभव आहे.’ पुजारा इंग्लंडमधील कौंटीत खेळत आहे. भारतीय संघाला त्याचा किती लाभ मिळू शकतो, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘पुजारा हा ससेक्सचे नेतृत्व करीत आहे. माझे त्याच्याशी विविध विषयांवर बोलणे व्हायचे. एका प्रकारातील खेळाडू बनून राहणे सोपे नसते. मीदेखील कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात एका प्रकारातील खेळाडू होतो. पुजारा आयपीएल खेळू शकला नसला, तरी त्याने बरेच क्रिकेट खेळलेले आहे. वन डे आणि टी-२० हे नवे प्रकार असले तरी कसोटी हा क्रिकेटचा सर्वमान्य असा प्रकार आहे. पुजारा संघासाठी फार मोलाचा फलंदाज आणि स्लिपमधील तरबेज क्षेत्ररक्षक असून, भारतीय संघाला त्याने अनेकदा यश मिळवून दिले आहे.

पुजाराला संधी...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत २४ कसोटी सामन्यांच्या ४३ डावात २०३३ धावा केल्या आहेत. कोच राहुल द्रविडला मागे सोडायचे असेल तर पुजाराला डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ११० धावा कराव्या लागतील. राहुल द्रविड यांनी ३२ कसोटी दोन शतके आणि १३ अर्धशतकांसह ६० डावात २१४३ धावा केल्या आहेत.  


 

Web Title: wtc final success says rahul dravid through hard work reached the final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.