WTC Final 2023, Team India | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. उभय संघांमधील हा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर असून कांगारूंचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हा ब्लॉकबस्टर सामना अत्यंत चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे. पण, एक चिंतेची बाब म्हणजे ओव्हलवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवणे भारतासाठी सोपे जाणार नाही. या मैदानावर रोहित ब्रिगेडचा कसोटी रेकॉर्ड चांगला नाही. त्यामुळे हा सामना थोडासा कठीण असू शकतो.
ओव्हलवर भारताची कामगिरी फारशी चांगली नाही. भारताने या मैदानावर एकूण 14 कसोटी सामने खेळले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यापैकी ५० टक्के सामन्यात भारताला कोणताही निकाल मिळवता आला नाही. १४ पैकी ७ सामने अनिर्णित राहिले. उरलेल्या ७ सामन्यांत देखील भारताची कामगिरी खूपच वाईट आहे. कारण भारताने त्यापैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्डही चांगला नाही
अशा परिस्थितीत भारताला दिलासा देणारी बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाचा देखील या मैदानावरचा खराब इतिहास. ओव्हलच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्डही फारसा बरा नाही. त्यांनी 38 पैकी केवळ 7 सामने जिंकले आहेत, तर 17 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांनी 106 सामने खेळले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने ४४ सामने जिंकले आहेत, तर भारताने ३२ सामने जिंकले आहेत. याशिवाय दोघांमध्ये २९ सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे.
या मैदानावर टीम इंडियाने शेवटचा सामना जिंकला होता ही दिलासादायक बाब आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या त्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली यजमान इंग्लंडचा १५७ धावांनी पराभव झाला होता. त्या सामन्यात रोहित शर्माने १२७ धावांची शतकी खेळी केली आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड (ओव्हलमध्ये)
भारत - 14 कसोटी, 2 विजय, 5 पराभव, 7 अनिर्णितऑस्ट्रेलिया - 38 सामने, 7 विजय, 17 पराभव, 14 अनिर्णित
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी रेकॉर्ड
एकूण 106 सामनेभारताने- 32 विजयऑस्ट्रेलिया- 44 विजयअनिर्णित- 29बरोबरी- 1
WTC अंतिम 2023 साठी दोन्ही संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), स्कॉट बोलँड, जोश हेझलवूड, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क.