साउथम्पटन : रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी शिस्तबद्ध फलंदाजी करीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा स्विंग मारा निष्प्रभ ठरविला, पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) फायनलच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी चहापानापर्यंत भारताने ३ बाद १४६ धावांची मजल मारली असताना अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यावेळी कर्णधार विराट कोहली (४४) व अजिंक्य रहाणे (२९) खेळपट्टीवर होते.
पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ शक्य झाला नाही. त्यानंतर आज हॅम्पशायर बाऊलचे ढगाळ वातावरणात बघता न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडमध्ये प्रथमच कसोटी सामन्यात डावाची सुरुवात करणारा रोहित (६८ चेंडू, ३४ धावा) आणि गिल (६४ चेंडू, २८ धावा) यांनी योजनाबद्ध खेळ केला.
रोहितने डावखुरा वेगवान गोलंदाज बोल्टविरुद्ध ओपन स्टान्सचा वापर केला तर गिलने साऊदीविरुद्ध क्रिजच्या बाहेर राहण्याची रणनीती अवलंबली.रोहित शर्मा व शुभमन गिलने सुरुवातीला काही आकर्षक फटके मारत न्यूझीलंडचे आव्हान पेलण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले. अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर दोघेही एका पाठोपाठ माघारी परतले.
जेमिसनचा आखूड टप्प्याचा चेंडू गिलच्या हेल्मेटच्या ग्रीलवर आदळला. याच वेगवान गोलंदाजाने रोहितला बाद करीत न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. साऊदीने तिसऱ्या स्लिपमध्ये त्याचा शानदार झेल टिपला. नील वँगनरने आपल्या पहिल्याच षटकात गिलला यष्टिरक्षक बी.जे. वॉटलिंगकडे झेल देण्यास भाग पाडले.
धावफलक
भारत पहिला डाव :- रोहित शर्मा झे. साऊदी गो. जेमिसन ३४, शुभमन गिल झे. वॉटलिंग गो. वँगनर २८, चेतेश्वर पुजारा पायचित गो. बोल्ट ०८, विराट कोहली खेळत आहे ३५, अजिंक्य रहाणे खेळत आहे १३. अवांतर (२). एकूण ६४.४ षटकांत ३ बाद १४६. बाद क्रम : १-६२, २-६३, ३-८८. गोलंदाजी : साऊदी १२.३-३-३४-०, बोल्ट ११-१-२९-१, जेमिसन १२-७-१४-१, ग्रँडहोम ११-६-२३-०, वँगनर ९-३-१९-१.