दुबई : भारताच्या नागरिकांना ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ब्रिटिश सरकारने भारताला ‘लाल यादी’त टाकले तरी, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साऊदम्पटन येथे खेळला जाईल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्पष्ट केले.
ब्रिटिश नागरिकांना देखील मायदेशी परतल्यानंतर दहा दिवस विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. भारतातील कोविड परिस्थिती चिघळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आयसीसीने मात्र डब्ल्यूटीसी फायनलचे आयोजन बायोबबलमध्ये करण्याविषयी विश्वास व्यक्त केला. ‘ईसीबी आणि अन्य सदस्यांनी कोरोना काळातही क्रिकेटचे यशस्वी आयोजन केल्यामुळे डब्ल्यूटीसी फायनलचे आयोजन करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत’, असे आयसीसीने स्पष्ट केले.
दुसरीकडे बीसीसीआयने भाष्य करण्यास नकार देत, जूनमध्ये भारतीय संघ ब्रिटनचा दौरा करेल, त्यावेळी भारत ‘लाल यादी’तून बाहेर पडलेला असेल,’ असा विश्वास व्यक्त केला. साऊदम्पटन मैदानाशेजारी असलेल्या हॉटेलमध्येच दोन्ही संघांची निवास व्यवस्था राहणार असल्याने फायनलच्या आयोजनात फारसा त्रास जाणवणार नसल्याचे ब्रिटिश माध्यमांनी म्हटले आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाला देखील जूनमध्ये इंग्लंडचा दौरा करायचा असून पुरुष संघ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार ईसीबीच्या प्रवक्त्याने म्टटले आहे की, लाल यादीत समावेश असलेल्या देशांवर होणाऱ्या प्रभावाबाबत सरकारशी बोलणी सुरू आहे. सोबत काम करीत आम्ही कोरोना काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे यशस्वी आयोजन केले. यंदा देखील यशस्वी आयोजन करू. भारताला या यादीत टाकल्यानंतर आयपीएल खेळणारे इंग्लिश आणि न्यूझीलंड संघातील खेळाडूंवर काय परिणाम होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. न्यूझीलंड संघ दोन जूनपासून इंग्लंडमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.