WTC Points Table 2023-25 : बांगलादेशच्या संघानं पाकिस्तानला घरच्या मैदानात रडायला लावलं. पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतील रावळपिंडी कसोटीत बांगलादेशनं विजयी सलामी दिली. या विजयासह बांगलादेशनं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत आपलं स्थान उंचावलं आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या संघानेही श्रीलंकेला मात देत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्यासाठी कंबर कसली आहे. बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यातील निकालानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. पण टीम इंडिया अजूनही अव्वल स्थानासह सेफ झोनमध्ये दिसते. एक नजर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवर...
बांगलादेशच्या संघानं घेतली पाकची जागा
बांगलादेश विरुद्धच्या घरच्या मैदानातील कसोटी सामन्याआधी पाकिस्तानचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर होता. पण पराभवामुळे पाकिस्तानचा संघ तळागाळात गेलाय. पाकिस्तान संघ आता ३०.५६ विनिंग पर्सेंटेजसह आठव्या स्थानावर आहे. दुसरीकडे रावळपिंडीचं मैदान मारतं बांगलादेशच्या संघाने त्यांची जागा घेतलीये. बांगलादेश संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहचला आहे. त्यांच्या विनिंग पर्सेंटेजचा आकडा ४० वर पोहचला आहे.
भारत टॉपला, ऑस्ट्रेलिया पुन्हा देतीये टक्कर
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सलग तिसऱ्या हंगामात टीम इंडिया गुणतालिकेत अव्वल आहे. पहिल्या दोन हंगामात टीम इंडिया फायनल खेळताना दिसली होती. पण आधी न्यूझीलंड आणि गत हंगामात ऑस्ट्रेलियन संघाने भारताला फायनलमध्ये पराभवाचा दणका दिला होता. यावेळीही पुन्हा ऑस्ट्रेलिया संघ टीम इंडियाला फाईट देताना दिसत आहे. भारतीय संघ ६८.५२ टक्के विनिंग पर्सेंटेजसह अव्वलस्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे विनिंग पर्सेटेज ६२.५० इतके आहे.
न्यूझीलंडसह इंग्लंडचा संघ टॉप ४ मध्ये पोहचलाय
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील विजयासह इंग्लंडचा संघ टॉप ४ मध्ये दिसतोय. न्यूझीलंड (५० विनिंग पर्सेंटेज ) पाठोपाठ इंग्लंडचा संघ (४१.०७ विनिंग पर्सेंटेज) चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा संघ ४० टक्के विनिंग पर्सेंटेजसह इथं पाहचव्या स्थानावर दिसतो. वेस्ट इंडिजचा संघ सर्वात तळाला असून त्यांच्या विरुद्धच्या कसोटी मालिकेत विजय मिळवणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ ३८.८९ विनिंग पर्सेंटेजसह सातव्या क्रमांकावर असल्याचे दिसून येते.