अत्यंत रोमहर्षक लढतीत बांगलादेशवर ३ विकेट्सनी मात करत भारतीय संघाने दुसरी कसोटी जिंकली. त्याबरोबरच भारतीय संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी बाजी मारली आहे. भारताच्या या विजयामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. तसेच गुणतक्त्यात भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून, ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत मोठ्या फरकाने विजय मिळवल्यास आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी भारतीय संघाकडे असेल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. तर बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकून भारताने तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आता बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी जिंकून भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत भारतीय संघाने आपल्या विजयाची टक्केवारी ५८.९३ पर्यंत पोहोचवली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेची विजयाची सरासरी ही ५४.५५ एवढी आहे. तर श्रीलंकेची सरासरी ही ५३.३३ एवढी आहे.
आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियन संघ १३ सामन्यात ९ विजय, १ पराभव आणि ३ अनिर्णित सामन्यांसह ७६.९२ विजयी टक्केवारीसह अव्वलस्थानी आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचे अंतिम सामन्यात खेळणे जवळपास निश्चित आहे. तर दुसऱ्या स्थानासाठी भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये चुरस आहे. तसेच तिन्ही संघांमध्ये विजयाच्या टक्केवारीचे अंतर अगदी किरकोळ आहे. त्यामुळे पुढील सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी करून अंतिम फेरीचे तिकीट पक्के करताना भारतीय संघाच्या कामगिरीचा कस लागणार आहे.
भारतीय संघाने आतापर्यंत १४ पैकी ८ सामने जिंकले आहेत. तर ४ सामने गमावले आहेत. तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.. भारत आपली पुढील मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला ४-०, ३-० किंवा ३-१ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागले. असा विजय मिळाल्यास भारतीय संघाचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का होईल.