WTC Points Table: श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात अगदी माफक अंतराने श्रीलंकेच्या संघाने बाजी मारली. या विजयासह श्रीलंकेला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलच्या शर्यतीत फायदा झाला आहे. दुसरीकडे पराभवामुळे न्यूझीलंडला मोठा दणका बसला आहे.
लंकेचा डंका; न्यूझीलंडला दणका देत मारली टॉप ३ मध्ये एन्ट्री
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातील विजयासह श्रीलेंकाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील गुणतालिकेत चौथ्या स्थानावर तिसऱ्या स्थानावर पोहचली आहे. दुसरीकडे २०२१ मध्ये पहिल्या वहिल्या हंगामात जेतेपद पटकवणारा न्यूझीलंडचा संघ टॉप ३ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या गुणतालिकेत बांगलादेश विरुद्धच्या विजयासह टीम इंडियाने आपलं अव्वलस्थान आणखी मजबूत केले असून भारतीय संघापाठोपाठ ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
टीम इंडिया नंबर वन; या संघात सुरुये तगडी स्पर्धा
सध्याच्या घडीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलच्या शर्यतीत भारतीय संघ ७१.६७ विनिंग पर्सेंटेजसह अव्वलस्थानी आहे. त्यापाठोपाठ गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघ ६२.५० विनिंग पर्सेंटेजसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील अटीतटीच्या लढतीत मिळवलेल्या विजयासह श्रीलंकेच्या विनिंग पर्सेंटेजचा आकडा हा ५० वर पोहचला आहे. न्यूझीलंडचा संघ या यादीत ४२.८६ विनिंग पर्सेंटेजसह चौथ्या स्थानावर आहे. ज्या इंग्लंडच्या मैदानात या स्पर्धेची फायनल रंगणार आहे तो इंग्लंडचा संघ ४२.१९ विनिंग पर्सेंटेजसह पाचव्या स्थानावर असल्याचे दिसून येते. त्यापाठोपाठ बांगलादेश (३९.२९ विनिंग पर्सेंटेज), दक्षिण आफ्रिका (३८.८९ विनिंग पर्सेंटेज), पाकिस्तान (१९.०५ पर्सेंटेज) आणि वेस्टइंडीज (१८.५२ विनिंग पर्सेंटेज) या संघांचा नंबर लागतो.
सहाव्या दिवशी निकाल, आघाडी घेऊनही पाहुण्या न्यूझींडवर आली पराभवाची वेळ
श्रीलंकेतील गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियम रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पहिल्या डावात ३०५ धावा केल्या होत्या. पाहुण्या न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या डावात ३४० धावा करत ३५ धावांची माफक आघाडी घेतली होती. श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या डावात ३०९ धावा करत न्यूझीलंडसमोर २७५ धावांचे आव्हान ठेवले होते. पाच दिवसांची हा कसोटी सामना सहाव्या दिवसावर गेला. ज्यात अखेरच्या दिवशी २ विकेट्स हाती असताना न्यूझीलंडच्या संघाला ६८ धावांची आवश्यकता होती. श्रीलंकेच्या संघाने या दोन विकेस्ट घेत सामना ६३ धावांनी जिंकला.