दुबई : भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत लॉर्ड्सचा दुसरा सामना १५१ धावांनी जिंकताच विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) नवीन गुणतालिकेत १४ गुणांसह अव्वल स्थान पटकाविले आहे. पाकिस्तानने काल वेस्ट इंडिजवर दुसऱ्या कसोटीत मिळविलेल्या विजयाचादेखील भारताला लाभ झाला.
आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या यादीत भारतीय संघ पहिल्या तर इंग्लंड अवघ्या दोन गुणासह तळाच्या स्थानावर आहे. पहिली कसोटी अनिर्णीत राहिल्याने भारताला चार तर दुसरा सामना जिंकल्याने भारताने १२ गुणांची कमाई केली. एकूण १६ गुण झाले असले तरी कूर्मगती गोलंदाजीचा फटकादेखील बसला. भारताच्या खात्यातून दोन गुण कमी करण्यात आले आहेत. डब्ल्यूटीसी नियमानुसार निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्यास एक गुण कमी होतो. प्रत्येक सामन्यात विजयाबद्दल १२ गुण, सामना टाय झाल्यास सहा गुण आणि अनिर्णीत सुटल्यास चार गुण मिळतात.
दुसऱ्या स्थानावर पाकिस्तान संघ असून, त्यांचे १२ आणि वेस्ट इंडिजचेही १२ गुण आहेत. तथापि, कालच्या पराभवामुळे विंडीज तिसऱ्या स्थानावर आला. डब्ल्यूटीसीची ही गुणतालिका २०२३ पर्यंत चालेल.