Kane Williamson NZ vs SA 2nd Test : न्यूझीलंडने ९२ वर्षांच्या कसोटी इतिहासात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथमच मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. स्टार फलंदाज केन विलियम्सन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आणखी एक शतक झळकावले. दोन सामन्यांच्या मालिकेतील हे त्याचे तिसरे शतक ठरले आणि त्याचे हे कसोटीतील ३२वे शतक ठरले. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेत ३ किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. न्यूझीलंडने ७ विकेट्स राखून ही कसोटी जिंकली आणि मालिका २-० अशी खिशात घातली. न्यूझीलंडच्या या विजयाने टीम इंडियाला धक्का बसला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील २४२ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव २११ धावांवर गडगडला. आफ्रिकेला दुसऱ्या डावात २३५ धावा करता आल्या. डेव्हिड वेडिंगहॅमने ११० धावांची महत्त्वाची खेळी केली. त्यानंतर किगन पीटरसन ( ४३) व कर्णधार नील ब्रँड ( ३४) हे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. २६७ धावांचा पाठलाग करताना टॉम लॅथम ( ३०) व डेवॉन कॉनवे ( १७) हे स्वस्तात माघारी परतले. पण, केन मैदानावर उभा राहिला आणि त्याने शतक झळकावले. त्याला विल यंगच्या अर्धशतकी खेळीची साथ मिळाली. केनने २६० चेंडूंत १२ चौकार व २ षटकारासह नाबाद १३३ धावा केल्या, तर विल ६० धावांवर नाबाद राहिला.
न्यूझीलंडने ३ बाद २६९ धावा करून विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC Standings ) मध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. या मालिकेपूर्वी न्यूझीलंडची जय-पराजयाची टक्केवारी ५० टक्के होती, परंतु आजच्या विजयाने ती ७५ टक्क्यांवर पोहोचली आणि ते थेट अव्वल स्थानावर पोहोचले. ऑस्ट्रेलिया ( ५५ टक्के) व भारत ( ५२.७७ टक्के) यांची अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी घसरण झाली.