दुबई : भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपदाची (डब्ल्यूटीसी) अंतिम लढत होणार आहे. विजेत्याला १६ लाख डाॅलर (सुमारे १३.२१ कोटी रुपये) इतकी रक्कम मिळणार आहे. तर उपविजेत्याला आठ लाख डाॅलर (६.५० कोटी) दिले जाणार आहेत.
आयसीसीने शुक्रवारी याची घोषणा केली. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम लढत ७ ते ११ जून या कालावधीत ओव्हलवर खेळवण्यात येणार आहे. विजेतेपदाची रक्कम २०१९-२० मध्ये होती तेवढीच आहे. त्यावेळी केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने १६ लाख डाॅलरची रक्कम आणि गदा जिंकली होती.
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या एकूण ३८ लाख डाॅलर बक्षिसाच्या रकमेतून ९ संघांना वाटा देण्यात येणार आहे.