ICC Test Championship points table : कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात रोमहर्षक सामन्यांमध्ये पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Pakistan vs Australia) यांच्यातल्या कराची येथे खेळवलेल्या दुसऱ्या कसोटीची नोंद झाली. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या ५०७ धावांच्या अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात खराब झाली होती. पण, कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) १० तास खेळपट्टीवर संघर्ष करत राहिला. त्याच्या सोबतीला अब्दुल्लाह शाफिक व मोहम्मद रिझवान हेही शड्डू ठोकून उभे राहिले. पराभवाच्या छायेत असलेला पाकिस्तानचा संघ ही कसोटी जिंकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु अखेरच्या क्षणाला त्यांनी सावध पवित्रा घेतला अन् सामना ड्रॉ राहिला.
पाकिस्तानने ही कसोटी जिंकली असती तर भारताला खूप मोठा फायदा झाला असता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ICC Test Ranking मध्ये थेट अव्वल स्थानी विराजमान झाले असते. पण, आता भारताला ११८ रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे आणि ऑस्ट्रेलिया ११९ रेटिंगसह अव्वल स्थानावर कायम आहे. या निकालाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ( WTC 23) फार बदल झालेला नाही.
WTC 2021-23 गुणतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर? भारतीय संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने सहा विजय मिळवले असून तीन अनिर्णीत निकाल आणि दोन पराभव पत्करले आहेत. भारताची जय-परायजाची टक्केवारी ही ५८.३३ इतकी आहे. ऑस्ट्रेलिया ( ७१.४२), पाकिस्तान ( ६१.११) आणि दक्षिण आफ्रिका ( ६०.००) हे भारताच्या पुढे आहेत.
WTC मध्ये भारताचे पुढील सामनेभारताचे आता एकूण ७ सामने शिल्लक आहेत. १ जुलैला भारत बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध स्थगित झालेली कसोटी खेळणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे.