ENG vs AUS : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातली Ashes 2023 मालिका सध्या चांगलीच गाजतेय... ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन कसोटीत शानदार विजय मिळवून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. लॉर्ड्सवर रंगलेल्या दुसऱ्या कसोटीतून चाहत्यांना, समालोचकांना, तज्ज्ञांना चर्चा करण्यासाठी अनेक मुद्दे दिले. विशेष म्हणजे या दुसऱ्या कसोटीनंतर दोन्ही देशांचे पंतप्रधानांमध्येही सोशल वॉर रंगताना पाहायला मिळतोय. हे सर्व सुरू असताना इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा फलंदाज ओली पोप ( Ollie Pope) याला खांद्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून आणि संपूर्ण समर सिजनमधून माघार घ्यावी लागली आहे.
बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने २ विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवला. उस्मान ख्वाजाची विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाची कोंडी झाली होती, परंतु कर्णधार पॅट कमिन्सने जबरदस्त खेळ करून इंग्लंडच्या तोंडचा घास पळवला. लॉर्ड्स कसोटीत स्टीव स्मिथ व पॅट कमिन्स यांनी घेतलेले झेल, जॉनी बेअरस्टोची स्टम्पिंग वादात अडकली. कॅमेरून ग्रीनचा बाऊन्सर चकवल्यानंतर बेअरस्टो क्रिज सोडून पुढे गेला अन् यष्टिरक्षक अॅलेक्स केरीने दूरून यष्टींचा वेध घेतला. जोरदार अपील झाले अन् बेअरस्टोला बाद दिले गेले. यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना स्लेज केले. उस्मान ख्वाजा व डेव्हिड वॉर्नर यांच्यासोबत चाहत्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचे दिसले.
०-२ अशा पिछाडीवरून मालिका जिंकण्याचे आव्हान इंग्लंडसमोर आहे आणि ६ जुलैपासून तिसरी कसोटी लीड्स येथे खेळवली जाणार आहे. पण, त्याआधीच फलंदाज ओली पोप याला खांद्याच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. पोपने पहिल्या दोन कसोटींत ३१ व ४ आणि ४२ व ३ अशा धावा केल्या होत्या. दुसऱ्या कसोटीत पोपला दुखापत झाली होती.