गुजरात टायटन्सने दणदणीत विजय मिळवताना मुंबई इंडियन्सला ५५ धावांनी सहज नमवले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळालेल्या गुजरातने २० षटकांत ६ बाद २०७ धावा उभारल्या. यानंतर मुंबईला २० षटकांत ९ बाद १५२ धावांवर रोखत गुजरातने शानदार विजय मिळवला.
सदर सामन्यानंतर गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयाल कुठे आहे, असा प्रश्न गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला विचारण्यात आला. हार्दिक पांड्या यश दयालला पुन्हा प्लेइंग XIमध्ये स्थान का देण्यात येत नाहीय?, केकेआरच्या रिंकू सिंगने ५ चेंडूत ५ षटकार लगावल्यानंतर यश दयालची आयपीएल कारकीर्द संपली आहे का?, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर हार्दिक पांड्याने देखील स्पष्टीकरण दिलं.
केकेआरविरुद्धच्या सामन्यानंतर यश गेल्या १० दिवसांपासून आजारी होता. त्याचे वजनही ८ ते ९ किलोने कमी झाले आहे. तरीदेखील तो खूप मेहनत करत आहे. तो लवकरच संघात परतेल असं हार्दिक पांड्याने सांगितले. दरम्यान, यश दयालच्या गोलंदाजीवर रिंकू सिंगने पाच षटकार मारल्यानंतर यशच्या आईने जेवण खाणे बंद केले होते, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. मात्र, खूप समजावून सांगितल्यानंतर त्यांनी जेवण सुरू केले.
दरम्यान, गुजरातविरुद्धच्या सामन्यात कोलकाताला सामना जिंकण्यासाठी ६ चेंडूत २९ धावा हव्या होत्या. कोलकात्याच्या विजयाची कोणालाच अपेक्षा नव्हती. रिंकू सिंगला उमेश यादवने एक धाव घेत स्ट्राईक दिली. त्यानंतर रिंकून १,२,३ नव्हे तर सलग ५ षटकार खेचले अन् कोलकाताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"