Yash Dhull creates Record : भारताच्या U19 संघाचा विश्वविजेता कर्णधार यश धूल याने आपला फलंदाजीतील तडाखा भारतात परल्यावरही तसाच सुरू ठेवला आहे. Ranji Trophy सामन्यात पदार्पणातच दिल्लीच्या संघाकडून खेळताना त्याने तामिळनाडूच्या फलंदाजांची अक्षरश: धुलाई केली आहे. रणजी पदापर्णाच्या सामन्यात पहिल्या डावात शतक ठोकलेल्या यश धूलने दुसऱ्या डावातही शतकाला गवसणी घातली. गुवाहटीच्या मैदानावर तामिळनाडूच्या गोलंदाजांचा समाचार घेत त्याने धडाकेबाज विक्रम रचला.
यश धूल हा विश्वचषक स्पर्धेत मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळत होता. मात्र रणजी सामन्यात त्याला दिल्लीच्या संघाने सलामीवीर म्हणून संधी दिली आणि त्याने संधीचं सोनं केलं. पहिल्या डावात यश ११३ धावा काढून बाद झाला. योगायोगाने दुसऱ्या डावातही यशने ११३ धावाच केल्या. पण दुसऱ्या डावात मात्र तो नाबाद राहिला. दिल्लीच्या फलंदाजांनी तामिळनाडूवर दुसऱ्या डावात वर्चस्व गाजवलं. यश धूल आणि ध्रुव शोरे (नाबाद १०७) या दोन सलामीवीरांनी सामना संपेपर्यंत फलंदाजी केली आणि नाबाद २२८ धावांची भागीदारी करून दाखवली. त्यामुळे सामनादेखील अनिर्णितच राहिला.
यश धूलने केला विराट, सचिन अन् रोहितलाही न जमलेला पराक्रम
यश धूलने दोनही डावात दमदार शतक ठोकले. फर्स्ट क्लास सामन्यांच्या व रणजी पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात शतक ठोकण्याचा पराक्रम विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यासारख्या मातब्बर फलंदाजांनाही जमला नव्हता. पण यश धूलने हा भीकपराक्रम करून दाखवला. असा पराक्रम करणारा तो तिसरा क्रिकेटर ठरला. याआधी नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी गुजरात कडून खेळताना आणि विराट स्वाठे यांनी महाराष्ट्र संघाकडून खेळताना रणजी पदार्पणाच्या दोन्ही डावात शतक ठोकलं होतं.