( Marathi News ) यशस्वी जैस्वाल व शिवम दुबे यांनी रविवारी झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अर्धशतकी खेळी करून भारताला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. या दोघांनी मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवलं आहे आणि आता BCCI त्यांना मोठं सप्राईज देण्याच्या तयारीत आहे. या दोघांनाही BCCI चा २०२३-२४चा वार्षिक करार देण्यात येणार आहे. बीसीसीआयने मार्च २६ मध्ये २०२२-२३च्या वार्षिक कराराची घोषणा केली होती आणि त्यात मुंबईच्या या दोन्ही खेळाडूंची नाव नव्हती.
यशस्वीने जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केले आणि त्याने आतापर्यंत ४ कसोटी सामन्यांत ४५.१४ च्या सरासरीने ३१६ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व १ अर्धशतक आहे. त्याच दौऱ्यावर त्याने ट्वेंटी-२० मालिकेत आक्रमक खेळ करून आपले स्थान मजबूत केले. त्याने आतापर्यंत १६ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १६३.८१चा स्ट्राईक रेट व ३५.५७ च्या सरासरीने ४९८ धावा केल्या आहेत. शिवमने तीन वर्षांनंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघात पदार्पण केले. आयर्लंडविरुद्धच्या २०२३च्या मालिकेत त्याची निवड झाली होती. इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील दमदार कामगिरीमुळे त्याचे पुनरागमन झाले. त्याने आतापर्यंत २० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ४५.८३च्या सरासरीने २७५ धावा केल्या आहेत आणि ८ विकेट्सही घेतल्या आहेत.
रविवारी झालेल्या सामन्यात शिवमने ३२ चेंडूंत नाबाद ६३ धावा कुटल्या. ३० वर्षीय शिवमने या मालिकेत दोन्ही सामन्यांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने पहिल्या सामन्यात ४० चेंडूंत नाबाद ६० धावा केल्या होत्या. शिवाय त्याने दोन विकेट्सही घेतल्या. "निवडक समिती सदस्य आणि संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे की त्याने अधिकाधिक गोलंदाजी करावी, कारण दुबेला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून खूप महत्त्व आहे. त्यामुळेच तो या मालिकेत चांगली गोलंदाजी करत आहे. जर त्याने अशीच कामगिरी केली, तर तो वेस्ट इंडिज आणि यूएसए मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीच्या संघात आपले स्थान निश्चित करू शकतो. दुखापतीने त्रस्त हार्दिक पांड्यासाठी तो पर्यायी खेळाडू आहे," असे बीसीसीआयमधील एका विश्वसनीय सूत्राने TOI ला सांगितले.
चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली शिवम दुबेच्या कारकीर्दिला नव्याने उंची मिळाली. त्याने आयपीएल २०२२ मध्ये ११ सामन्यांत २८९ धावा केल्या आणि २०२३ मध्ये त्याने ४०० हून अधिक धावा केल्या. आयपीएलमध्ये प्रथमच त्याने एका पर्वात इतक्या धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्सला विक्रमी पाचवे जेतेपद जिंकून देणाऱ्या शिवमने १६ सामन्यांत ४१८ धावा करताना जेतेपदात महत्त्वाचा वाटा उचलला.