India vs England 2nd Test ( Marathi News ) : भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात द्विशतकी खेळी करून अनेक विक्रमांना गवसणी घातली. २२ वर्षीय फलंदाजाने त्याच्या कारकीर्दितील सर्वोत्तम २०९ धावांची खेळी विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर खेळली. डावखुऱ्या फलंदाजाने २९० चेंडूंचा सामना करताना १९ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने हा डाव सजवला... दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावून यशस्वीने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या एका अनोख्या विक्रमाच्या क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे.
रोहित शर्मा व विराट कोहली यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त शतक व कसोटीत द्विशतक झळकावणारा यशस्वी तिसरा भारतीय फलंदाज बनला आहे. भारतासाठी आतापर्यंत २५ खेळाडूंनी कसोटीत द्विशतक झळकावले आहेत, तर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ९ खेळाडूंनी १००+ धावा केल्या आहेत. पण, रोहित, विराट आणि आता यशस्वी हे तीन असे खेळाडू आहेत की ज्यांच्या नावावर ट्वेंटी-२०त शतक व कसोटीत द्विशतक आहे.
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०मध्ये पाच शतकं झळकावली आहेत आणि कसोटीत एक द्विशतक ( २१२) त्याच्या नावावर आहे, तर कोहलीने कसोटीत ७ द्विशतकं झळकावली असून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त एक ( १२२*) शतक त्याच्या नावावर आहे. २०२२ मध्ये आशिया चषक स्पर्धेत दुबई येथे विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२०त शतक झळकावले होते.
यशस्वीने वेस्ट इंडिजविरुद्ध १२ जुलै २०२३ मध्ये भारतासाठी पदार्प केले आणि त्यानंतर आशियाई स्पर्धेत नेपाळविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत त्याने १०० धावा केल्या होत्या. लोकेश राहुलला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळता आले नव्हते. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर दोन शतकं आहेत, पंरतु कसोटीत द्विशतक नाही. त्याने २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत १९९ धावा केल्या होत्या.