लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : 'युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल कुठल्याही परिस्थितीत खेळण्यास सक्षम आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मानसिक स्तरावर ताळमेळ साधावा लागेल,' असे मत वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा यांनी मंगळवारी केले. जैस्वालने आठ कसोटी सामन्यांत ६६.३५ च्या सरासरीने ९२९ धावा केल्या. त्यात दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे.
लारा म्हणाले, 'यशस्वीमध्ये कुठल्याही वातावरणात खेळण्याची क्षमता आहे. ऑस्ट्रेलियातील वेगळ्या खेळपट्ट्यांवरही तो स्वतःच्या खेळाचा ठसा उमटवू शकेल. तेथे यश मिळविण्यासाठी त्याला मानसिक ताळमेळ साधावा लागणार आहे. आयपीएलद्वारे भारताला अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू गवसले आहेत. प्रत्येक परिस्थितीत आपण चांगली कामगिरी करू शकतो, असा विश्वास त्यांनी बाळगावा.
घरापासून दूर ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मैदानावर मात देणे ही वेगळी गोष्ट आहे. पण, माझ्या मते भारतीय संघ विजय मिळविण्यास सक्षम वाटतो.' लारा यांनी पावसाच्या व्यत्ययानंतरही कानपूर कसोटीत आक्रमक खेळून बांगलादेशला नमविणाऱ्या भारतीय संघाच्या वृत्तीचे कौतुक केले. ते म्हणाले, 'भारतीय संघाने स्वतः साठी संधी शोधली. फार कमी वेळ मिळाला तरी भारताने उत्कृष्ट फलंदाजीसह बांगलादेशवर दडपण आणले होते.'