Yashasvi Jaiswal ICC Ranking: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी जैस्वालच्या शानदार फॉर्ममुळे भारताला चांगला फायदा झाला. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी जैस्वाल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ४ कसोटी सामन्यांच्या ८ डावात ६६५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर यशस्वी जैस्वालला उत्कृष्ट फलंदाजीमुळे आयसीसी क्रमवारीत चांगला फायदा झाला आहे.
यशस्वी जैस्वाल आयसीसी कसोटी क्रमवारीत १२व्या स्थानावर पोहोचला आहे. या युवा फलंदाजाचे ७२७ रेटिंग गुण आहेत. रांची कसोटीपूर्वी यशस्वी जैस्वाल १५व्या स्थानावर होता. चौथ्या कसोटी सामन्यानंतर त्याने तीन स्थानावरून झेप घेत ११वे स्थान गाठले आहे. ICC कसोटी क्रमवारीत अव्वल-१० मध्ये विराट कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. पण पाचव्या कसोटीत यशस्वी जैस्वालला विराट कोहलीला मागे टाकण्याची सुवर्णसंधी असेल.
यशस्वीचा झंझावात सुरूच! विराट कोहलीचे ७४४ रेटिंग गुण असून तो क्रमवारीत ९व्या स्थानावर आहे. अशाप्रकारे यशस्वी जैस्वाल विराट कोहलीपेक्षा फक्त १७ गुणांनी मागे आहे. विराट कोहलीशिवाय इतर कोणताही भारतीय फलंदाज आयसीसी क्रमवारीत टॉप-१० मध्ये नाही. भारताच्या उर्वरित फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्मा १३व्या क्रमांकावर आहे. तर रिषभ पंत १४व्या क्रमांकावर स्थित आहे.
दरम्यान, आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत ध्रुव जुरेलने सर्वात मोठी झेप घेतली आहे. रांची कसोटीपूर्वी ध्रुव जुरेल ६९व्या स्थानावर होता, मात्र आता तो ३१व्या स्थानावर आला आहे. याशिवाय न्यूझीलंडचा केन विल्यमसन पहिल्या स्थानावर कायम आहे. यानंतर स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे.