IND vs AFG 3rd T20I ( Marathi News ) : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी घेत अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकलीच आहे. आज IND vs AFG यांच्यातला तिसरा व शेवटचा ट्वेंटी-२० सामना बंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ६८ धावांची महत्त्वाची खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालसाठी ( Yashasvi Jaiswal) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICC ने ही बातमी पोस्ट केली आहे.
आयसीसीने आज वन डे व ट्वेंटी-२० क्रमवारी जाहीर केली केली. श्रीलंकेच्या महीश तिक्षणाने ३ स्थानांच्या सुधारणेसह वन डे गोलंदाजांमध्ये ८ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. वनिंदू हसरंगा याने २८ स्थान वर झेप घेतली आहे. तिक्षणा हा अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीसह ( ६४८) संयुक्तपणे आठव्या क्रमांकावर आहे. दुखापतीमुळे हसरंगाना वर्ल्ड कप खेळता आला नव्हता, परंतु त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत ५.५ षटकांत १९ धावा देताना ७ विकेट्स घेऊन पुनरागमन केले. भारताचे मोहम्मद सिराज ( ६७८) व जसप्रीत बुमराह ( ६६५) हे अनुक्रमे तिसऱ्या व सहाव्या क्रमांकावर आहेत.
ट्वेंटी-२० गोलंदाजीत भारताच्या अक्षर पटेलने मोठी भरारी घेतली. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याने चांगली कामगिरी करून दाखवली आहे आणि तो १२ स्थानांच्या सुधारणेसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. रवी बिश्नोई ( ६६६ ) ट्वेंटी-२० गोलंदाजांत भारताकडून सर्वोत्तम क्रमवारीवर होता त्याला अक्षरने ( ६६७) मागे टाकले. फलंदाजांमध्ये यशस्वीने ७३९ रेटींग पॉईंटसह सातवा क्रमांक पटकावला आहे. सूर्यकुमार यादव ( ८६९) अव्वल स्थानावर कायम आहे, तर ऋतुराज गायकवाड ( ६६१) हा एक स्थान खाली सरकून नवव्या क्रमांकावर आला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करणारा शिवम दुबे २०७ स्थानांची झेप घेताना ५८व्या क्रमांकावर आळा आहे.