भारतीय संघाला १० वर्ष आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. २०१३ मध्ये भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती, परंतु त्यानंतर त्यांना आयसीसी स्पर्धांच्या जेतेपदाने हुकलावणी दिली आहे. २०२१ व २०२३ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची संधी होती, पण संघातील दिग्गज फेल ठरले. ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आता भारतीय संघ आगामी वन डे वर्ल्ड कप व पुढच्या वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे.
भारतीय संघ आता १ महिना क्रिकेट खेळणार नाही. पुढील महिन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर २ कसोटी, ३ वन डे आणि ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. BCCI ने कालच या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. आता भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातही फेरबदल होताना दिसणार आहेत. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ पूर्णपणे बदललेला दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. बीसीसीआयने ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवून त्या दिशेने वाटचाल केली आहे.
२०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला सुपर १२ स्टेजमध्ये गाशा गुंडाळावा लागला होता, तर २०२२ मध्ये उपांत्य फेरीत इंग्लंडकडून हार पत्करावी लागली होती. त्यानंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवले गेले आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांना या फॉरमॅटपासून दूर ठेवले गेले आहे. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावरही हेच चित्र पाहायला मिळणार आहे. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार वेस्ट इंडिज दौऱ्यावरील ट्वेंटी-२० मालिकेसाठी रिंकू सिंग, जितेश शर्मा, ऋतुराज गायकवाड व यशस्वी जैस्वाल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या सर्वांनी IPL 2023 स्पर्धा गाजवली आहे.
कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना रिंकूने १४९.५२ स्ट्राईक रेटने ४७४ धावा केल्या. जितेशने पंजाब किंग्सकडून १५६.०६ स्ट्राईक रेटने ३०९ धावा केल्या आहे. ऋतुराजनेही सातत्यपूर्ण कामगिरी करताना CSK कडून सर्वाधिक ६२५ धावा केल्या आहे. त्यात पाच अर्धशतकं व १ शतक झळकावलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैस्वालनेही यंदाची आयपीएल गाजवली आहे.