युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने पहिल्या चेंडूपासून चढवलेला हल्ला अखेरपर्यंत कायम राखत राजस्थान रॉयल्सला एकहाती विजय मिळवून देणारा ठरला. त्याने आयपीएल इतिहासातील सर्वांत वेगवान अर्धशतक झळकावत कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांची पिसे काढली. जैस्वालच्या जोरावर राजस्थानने कोलकाताचा तब्बल ४१ चेंडू आणि ९ गडी राखून धुव्वा उडवला. जैस्वालचे सर्वांत वेगवान अर्धशतक आणि युझवेंद्र चहलचे सर्वाधिक बळी अशा दोन आयपीएल विक्रमांनी हा सामना गाजला.
यशस्वी जैस्वालच्या या आक्रमक खेळीचे सर्वांकडून कौतुक होत आहे. यशस्वी जैस्वालला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. यावेळी त्याने एक मुलाखत दिली. माझ्या मनात नेहमी चांगला खेळ करणे हेच असते. चांगल्य खेळीनंतर संघाचा विजय होतो, तेव्हा मला खूप आनंद वाटतो. मी सर्वतोपरी प्रयत्न करतो आणि त्यासाठी तयारी आणि विचार महत्त्वाचा आहे, असं यशस्वी म्हणाला.
शेवटपर्यंत राहून संघाला विजय मिळवून देण्याचे कौशल्य मी शिकत आहे. तेच माझे ध्येय आहे, असं यशस्वीने सांगितले. यशस्वी पुढे म्हणाला की, शतक करण्याचा विचार केला नव्हता. संजू भाई मला काळजी करू नकोस आणि असेच खेळत राहा असा सांगत होता. महान खेळाडूंसोबत खेळणे हा बहुमान आहे. तरुण खेळाडूंसाठी आयपीएल हे एक उत्तम व्यासपीठ असल्याचं यशस्वीने सांगितले.