Yashasvi Jaiswal Play in Ranji Trophy Semifinal : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या भारतीय संघातील अंतिम यादीतून पत्ता कट झाल्यावर आता यशस्वी जैस्वाल पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. रणजी करंडक स्पर्धेत अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघानं सेमीफायनल गाठली आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात यशस्वी जैस्वाल मुंबईच्या ताफ्यातून मैदानात उतरणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गत फायनलिस्टमध्ये रंगणार सेमीचा थरार
रणजी करंडक स्पर्धेत मुंबई आणि विदर्भ यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना रंगणार आहे. १७ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या नागपूरच्या मैदानात ही लढत रंगणार आहे. गत हंगामात जे दोन संघ फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध भिडले होते त्या दोन संघामध्ये यावेळी फायनलमध्ये धडक मारण्याची शर्यत रंगणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातून यशस्वीचं नाव झालं 'गायब'
यशस्वी जैस्वाल याची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. पण अंतिम यादीतून त्याचे नाव गायब झाले. तो आता राखीव खेळाडूंच्या यादीत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधीच यशस्वीला इंग्लंड विरुद्ध वनडे पदार्पणाची संधी मिळाली. नागपूरच्या मैदानातूनच त्याने वनडे पदार्पण केले. पण या सामन्यात त्याला आपल्या भात्यातीच चमक दाखवता आली नव्हती. २२ चेंडूत फक्त १५ धावा करून तो बाद झाला अन् मग आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या संघातून त्याच्यावर आउट होण्याची वेळ आली. यशस्वी जैस्वाल राखीव खेळाडूंच्या यादीत असला तरी तो दुबईला जाणार नाही. त्यामुळे आता तो मुंबईच्या संघाकडून रणजी खेळताना दिसेल.
रणजी करंडक स्पर्धेत हरयाणाला शह देत मुंबईनं गाठलीये सेमी
रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत मुंबई आणि हरयाणा यांच्यात सामना झाला. या सामन्यात अडचणीत सापडल्यावर दमदार कमबॅक करत मुंबई संघानं बाजी मारली. त्यांनी पुन्हा एकदा सेमीच तिकीट पक्क करत यंदाच्या हंगामातील जेतेपद मिळवण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकले. विजयी सिलसिला कायम ठेवून पुन्हा एकदा रणजी स्पर्धा अधिराज्य गाजवण्यासाठी मुंबईचा संघ प्रयत्नशील असेल. यशस्वीच्या एन्ट्रीनं निश्चितच मुंबईची ताकद आणखी वाढेल.